Wednesday, December 12, 2007

एक दिवाळी अशीही येते - उपसंहार

भाऊंच्या गाडीतून आम्ही परत आमच्या गावी सुखरूप पोचलो.
भाऊंच्या यशस्वी भेटीची बातमी ऐकून आमचे मित्रमंडळ अत्यंत खूष झाले.
पाच नोव्हेंबरला ठरल्याप्रमाणे शिवाजी मैदानावर आस-पारा संयुक्त विद्यमाने डर्टट्रॅक मोटरसायकलिंग स्पर्धा झाल्या.
भाऊंच्या शब्दाप्रमाणे मुंबईचे - पुण्याचे तीस - चाळीस स्पर्धक स्वखर्चाने स्पर्धेला आले.
स्पर्धेच्या वेळेत गावात जणू कर्फ्यू लागला होता. सारं गावच मैदानावर स्पर्धा पाहण्यासाठी जमा झालं होतं. कोडोलीकर सरकार - आण्णा कलावंतही आले होते.
हजारो लोकांनी टाळ्या, शिट्ट्या आणि आरोळ्यांनी मैदान दणाणून सोडले. अनेक पटके, टोप्या हवेत उडवल्या गेल्या.
संजय बारकुटे, विजय बारकुटे, निव्या, विष्णू, बालमुकुंद, देवू , श्रीनिवास पाडळे, उत्तम पाटील, विकास पाटील, सुदर्शन माळी, निशिकांत मुक्कणावर, किरण परचुरे, हेमंत सावंत, अजय जोशी, संजय कणकवलीकर - सगळी मंडळी कृतकृत्य झाली.
श्रीकांत गोगटे प्रमुख निरीक्षक म्हणून आले होते. त्यांनी आमच्या प्रयत्नांची वाखाणणी केली. पुढच्या वर्षी कोडोलीच्या माळावर मोटोक्रॉस स्पर्धा घेण्याचं जाहीर करून टाकलं.
इंदिरा गांधी सहकारी साखर कारखान्यानं आमच्या क्लबला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
दुसऱ्या दिवशी दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातल्या वर्तमान पत्रांमध्ये स्पर्धेचे वृत्तांत छापून आले. राजाचा फोटोही आला होता. कुठेकुठे माझाही उल्लेख होता.
पण मकरंद साठे या नावाचा उल्लेख कुठेच नव्हता आणि तो कधीही होणार नाही याची मला खात्री होती. मकरंद साठेचं पुढं काय झालं हे मला माहित नाही. माझं पुढं काय झालं ते त्यालाही माहीत नाही. प्रत्येक दिवाळीत मला तो हमखास आठवतो. तुम्हाला भेटला तर तुम्ही सांगा त्याला - मी आठवण काढत होतो म्हणून...
या दिवाळीत पुण्याला गेलो तर त्याला भेटीन म्हणतो... लक्ष्मीपूजनादिवशी - तो सुंदरनगरातच असेल आणि सुंदरनगर तिथेच असेल तर!!

एक दिवाळी अशीही येते-९

समोर एक संगमरवरी देऊळ होते. नव्यानेच बांधले असावे. देवळात ही गर्दी जमली होती. आम्ही पोचलो तर भाऊ राधाकृष्णाच्या संगमरवरी मूर्तीसमोर बसून पूजा करत होते. कपाळावर उभा नाम ओढलेले पांढऱ्या शुभ्र पोषाखातले भाऊ एखाद्या पुढाऱ्यासारखे दिसत होते. शेजारी त्यांच्या दोन्ही पत्नी सुंदरा आणि सुरेखा हात जोडून बसलेल्या होत्या. सोवळ्यातला भटजी मोठमोठ्याने मंत्र उच्चारत होता. आम्हीही हात जोडून उभे राहिलो.
पूजा संपली तसे आम्ही भाऊंच्या मागोमाग मंदिराच्या मागे गेलो. तिथे आता काळोख माजला होता. पण त्या अंधारातही एक कोलाहल ऐकू येत होता. बरीच माणसं जमली असावीत. "भाऊ करायची का सुरुवात?" मकरंदने विचारले. भाऊंनी मानेनेच रुकार दिला. दोन माणसांनी अंधारातच फटाक्यांच्या माळेची एक गुंडाळी उलगडायला सुरुवात केली. माळ बरीच लांब असावी. ते अंधारात दिसेनासे झाले. "संपली का रे?" मकरंद. "हां, झालं दादा.लावा आता." अंधारातून आवाज आला.
भाऊंनी माळेला बत्ती दिली त्यासरशी कानठळ्या बसणारा आवाज करत फटाके उडू लागले. तब्बल दहा मिनिटे तो मुसळधार पावसासारखा आवाज आसमंतात घुमत होता. शेवटचा फटाका उडाल्यावर काही क्षण शांतता पसरली. देवळाच्या पाठभिंतीलगतच्या कट्ट्यावर एक मोठा स्विच बोर्ड ठेवलेला होता. भाऊंनी एकापाठोपाठ एक पंधरावीस बटनं दाबली, काही झगझगीत फ्लडलाइट्स उजळले आणि माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना... समोर एक भव्य पटांगण पसरलं होतं. त्यात प्रचंड गर्दी उसळलेली होती. पटांगणाच्या तीन बाजूंना उंच भिंती होत्या आणि चौथ्या बाजूला पाठमोरं देऊळ. या भिंतीच्या कडेने ओळीने बरीच टेबले मांडलेली होती आणि प्रत्येक टेबलभोवती लोकांचे कोंडाळे होते. भिंतींवर रंगीबेरंगी बल्बच्या माळा झगमग करत होत्या. टेबलाच्या वरून एक दोरखंड फिरवलेला होता. या दोरखंडाला मध्येमध्ये बांबूंनी आधार दिलेला होता. त्या दोरखंडावर शंभराच्या बल्बच्या माळा लटकत होत्या. शिवाय प्रत्येक टेबलाच्या बरोबर वर गुलाब, शेवंती आणि झेंडूंच्या जाडजूड माळा लटकत होत्या. शेकडो माणसं भाऊंकडे कसल्याशा अपेक्षेनं पाहत होती. चित्रात असावीत तशी ती स्तब्ध होती. फ्लड लाइट आणि बल्बांच्या प्रकाशात लख्ख उजळलेल्या त्या गर्दीचा अर्थ मला समजलाच नाही.
मकरंदने एक नारळ भाऊंच्या हातात दिला. भाऊंनी कट्ट्याच्या कोपऱ्यावर आपटून एका फटक्यात तो फोडला आणि मोठ्याने म्हणाले," हां, करा आता सुरू..." त्याक्षणी त्या गर्दीला जीव आला. चारी कोपऱ्यात लावलेल्या कर्ण्यांमधून 'बिलनशी नागिन निघाली..ढिंगढिंग.. नागोबा घुमाया लागला..ढिंगढिंग..बिलनशी नागिन निघाली.. नागोबा घुमाया लागला..ढिंगांटिकां.. ढिंगांटिकां..' सुरू झालं. "पाच खाली...पाच खाली...", "लगाव..लगाव..", "आव...आव...", "एक का दस! एक का दस!", "है शाब्बास! लगा,लगा, लगा" अशा ललकाऱ्या प्रत्येक टेबलावरून ऐकू येऊ लागल्या. हजारभर माणसं एका विलक्षण धुंदीत बेहोष होत होती. "हा आमचा ग्रँड कसीनो हां..." मकरंद म्हणाला आणि माझ्या टाळक्यात थोडा उजेड पडला. "प्रत्येक टेबलावर चक्री, फासे किंवा पत्ते आहेत. सुसंस्कृत भाषेत रोले व्हील, डाइस आणि ब्लॅक जॅक म्हण रे!" मकरंद उपरोधिकपणे म्हणाला,"खेळतोस काय?" "मी?" "का रे? लक्ष्मीपूजनाला जुगार खेळावा असं म्हणतात ना ती सुसंस्कृत माणसं? मग बघ की खेळून कशी मजा येते!" मकरंद हसत होता, "खेळतोस काय? एका रुपयाला दहा रुपये मिळतील बघ!" "नको, नको!" मी घाईघाईनं म्हणालो. "आणि राजा तू रे?" मकरंद राजाकडे वळला. तोही नुसता बघत होता. "आं?" "खेळतोस काय?" मकरंद आमंत्रण देत होता. "नाय राव. हे आपल्याला नाही जमायचं, बघताबघता गंडवतील मला ," राजा. " राजा, इथं फसवाफसवी नाही. एकदम चोख व्यवहार असतो. माझा हुकूमच आहे तसा!" "म्हणजे, हेपण तूच!?" मी आवंढा गिळला. "मग? अरे, भाऊंना बाहेरचे काँटॅक्ट बघायचे असतात. शिवाय आता राजकारण आहे. दरवर्षी कसल्यातरी निवडणुका असतातच. मग त्यात त्यांचा वेळ जातो. माणसं, पैसे, मतं... कटकटीचं काम. शिवाय आपल्या माणसांना सांभाळायचं, त्यांच्या पोलिस-केसेस, कोर्ट, कुटुंबं - सगळं करायला लागतं त्यांना. म्हणून सगळे धंदे मीच सांभाळतो!" मकरंद तटस्थपणे सांगत होता. " पुणे मटकासुद्धा!" "मटका म्हणजे काय असतं?" मी कुतूहलानं विचारलं," हा काय प्रकार असतो? मडक्याशी काय संबंध याचा?" "पूर्वी मडक्यातून पत्ते काढत असत. मलाही नक्की माहीत नाही. पण मटका म्हणजे नक्की काय ते असं सांगून नाही कळायचं तुला. तो एक चमत्कार आहे म्हण की. 'सचोटी' कशाला म्हणतात ते शिकावं त्यात. एका कागदाच्या चिटोऱ्यावर रिफिलनं खरडलेल्या काही आकड्यात करोडो रुपयांचा व्यवहार होतो. आहेस कुठं? आज कल्याणाला पाच कोटी, मुंबईला साडे तीन आणि आमच्या मटक्याला ऐंशी लाख लागलेत ओपनला. क्लोजला तितकेच... हे फक्त आमच्या भागातून. एकूण किती असतील त्याची कल्पना कर फक्त." "ओपन काय..क्लोज काय! काही समजत नाही मला. जाऊ दे." मी आक्रसलो. "अरे ते सोपं आहे.. एक ते दहा कोणतेही तीन अंक सांग मला.." "पाच.. तीन.. दोन.." मी गमतीत म्हणालो. "हा.. आता या तीन संख्यांची बेरीज कर.." "दहा.." "हां.. हे दोन, तीन, पाच म्हणजे पानं आणि हा दहा म्हणजे आकडा." "आकडा?" "हा झाला ओपन. आता पुन्हा तीन अंक सांग..." "चार.. सहा.. आठ.." "बेरीज अठरा.. आठ आणि एक नऊ..म्हणजे नऊ. चार, सहा, आठ आणि नऊ .. हा झाला क्लोज." मकरंद लिहून घेत होता. "आता बघ. लोक या एक ते दहा यांपैकी कोणत्याही सहा अंकांवर पैसे लावतात. ओपनला आणि क्लोजला - असं म्हणायची पद्धत आहे - ती आली लंडन कॉटन, मुंबै कॉटन स्पेक्युलेशनच्या काळात - इंग्रजांचं राज्य होतं तेव्हाच सट्टा होता. लंडन कॉटनच्या मार्केट ओपन आणि क्लोज होण्याच्या भावावर सट्टा खेळत लोक. इंग्रज गेले पण ओपन-क्लोज मागे ठेवून. आज शेअर मार्केटसुद्धा स्पेक्युलेशनवरच चालतं. हर्षद मेहताचं नाव ऐकलं आहेस ना?"
त्यावेळी हर्षद मेहता अजून जोरात होता. शेअर मार्केटचा सम्राट होता. प्रत्येक वर्तमानपत्रात दररोज त्याच्या अफाट श्रीमंतीच्या बातम्या छापून येत होत्या. सुशिक्षित, मध्यमवर्गीय समाज झटपट श्रीमंत होण्याशी स्वप्नं पाहत होता. "मटका म्हणजे या असंस्कृत, रानटी माणसांचं स्टॉक मार्केट रे! फक्त नाव वेगळं, दर्जा वेगळा.. " मकरंद मिस्किलपणे म्हणाला,"एका रुपयाला आठ, ऐंशी किंवा आठ हजार रुपये मिळतात इथे. एका पानाला आठपट, दोन्ही आकड्यांना ऐंशीपट आणि जर सगळी पानं बरोबर आली तर - आठ हजार पट!! आणि एक रुपयासुद्धा पुरतो हा सट्टा खेळायला. स्टॉक मार्केटसाठी लागणारे हजारो रुपये नसले तरी चालतात. कोणीही भिकारीसुद्धा खेळू शकतो आणि लक्षाधीश बनू शकतो. लॉटरीचं तिकीट लागलं तर सरकार इन्कम टॅक्स कापून घेतं.. इथं नो टॅक्स.. रोखीचा व्यवहार, ताबडतोब पैसे... काय घेतोस ना लॉटरीचं तिकीट?" मकरंद डोळे मिचकावत म्हणाला. "अरे पण, लॉटरीतून मिळणारा फायदा शेवटी सरकारच्या म्हणजे लोकांच्याच वापरासाठी खर्च होतो!" मी लॉटरीचं समर्थन करत होतो की माझ्या लॉटरी खरेदीचं? "म्हणजे पुढाऱ्यांच्या आणि पैसे खाणाऱ्या ऑफिसर्सच्या फायद्यासाठी.. असंच ना? आणि इथे आलेला पैसा? ही जी हजारो माणसं राहतात, जगतात सुंदरनगरात त्यांचा खर्च कुठून येतो वाटतंय तुला? या अशिक्षित, असंस्कृत माणसांना कोण देणार पगार? त्यांना अडीअडचणीला कितीही पैसे लागले तरी भाऊ देतात सगळे. शिवाय सणावाराला बोनस, कपडेलत्ते! सुंदराताईला देवी मानतात लोक इथले.." मी निरुत्तर झालो. हळूहळू कट्ट्यासमोर माणसे जमा होऊ लागली. तिथे एक फळा मांडण्यात आला. त्याच्या समोर देवासमोर लावतात तसा उदबत्तींचा जुडगा लावला गेली. एका फ्लडलाइटचा प्रकाशझोत फळ्यावर सोडण्यात आला. फळ्यावर वरच्या बाजूला मध्यभागी मोठ्या अक्षरात "श्री" रंगवला होता तर एका कोपऱ्यात "शुभ" आणि दुसऱ्या कोपऱ्यात "लाभ". खाली तीन चौकटी, मग त्याखाली एक, खाली पुन्हा तीन आणि पुन्हा त्याखाली एक.
एक खुरटी दाढी वाढवलेला, लालबुंद डोळ्यांचा इसम मकरंदकडे येऊन म्हणाला, "दादा, तयारी झाली." मकरंदने घड्याळात नजर टाकली, म्हणाला, "साडे आठला ओपन आहे आपला..." मग तो फळ्याकडे गेला आणि एक खडू घेऊन चौकटीत अंक लिहू लागला. आता मैदानातला प्रत्येकजण फळ्याकडे पाहत होता. प्रत्येकाचा श्वास रोखलेला होता. "दुर्री..."मकरंदच्या अंक लिहिण्याबरोबर गर्दीतून आरोळी उठत होती. "तिरी..." "पंज्या"... "ओपन दस्श्या.....दस्श्या ओपन -मेंढी आली! " एकदम जोरदार आरोळी उठली. फटाक्यांचा आवाज घुमू लागला. अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मी पाहतच राहिलो. मी गंमत म्हणून सांगितलेल्या आकड्यांवर आज अनेकांचं भाग्य उजळत होतं...अनेकांच्या आयुष्यात दिवाळी साजरी होणार होती. साक्षात लक्ष्मीनं आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माझ्या तोंडून तिची इच्छा बोलून दाखवली होती. "पुढचे तीन कुणाला सांगू नकोस हां!" मकरंद माझ्या कानात पुटपुटला. "आणि क्लोज रे?" राजा विचारता झाला. "तो रात्री एक वाजता!" मकरंदने माहिती पुरवली."प्रत्येक मटक्याच्या वेळा ठरलेल्या असतात. शक्यतो इतर मटक्यांशी क्लॅश होऊ देत नाहीत." "चला, निघू या काय? साडे आठ वाजले!" मी भानावर येऊन म्हणालो. "निघायचं लगेच?" मकरंद मैदानाकडं पाहत म्हणाला," अरे, आत्ता कुठे रंग भरायला लागलाय.." "आता नको, उशीर झालाय. रात्री गावी पोचलं पाहिजे." राजानंही अनुमोदन दिले. "पुन्हा कधीतरी येईन.." मी पुटपुटलो. "हा..हा.. हा..." मकरंद मोठ्याने हसला. "आता पुन्हा कशाला येणार तुम्ही लोक इकडे?" "नाही.. तुला भेटायला कधीतरी..." मी कसंनुसं म्हणालो. "जाऊ दे रे, ते तुझं जग वेगळं, आमचं हे जग वेगळं.. तू कशाला फिरकतोस आता इकडे? हा... कधी आठवण झाली तर फोन कर मला. आणि पुण्यात कधीही, कसलीही अडचण आली तर सांग, एका फटक्यात सोडवीन - हा मकरंद साठेचा शब्द आहे. आठवण मात्र ठेव हां." "काय हे मकरंद? तुला, भाऊंना, या सुंदरनगराला आयुष्यात कधी विसरू शकेन का मी?" मी मनापासून म्हणालो. "बरं, चला आता..." मकरंद आम्हाला घेऊन परत निघाला.
* * * *

एक दिवाळी अशीही येते-८

एखाद्या किल्ल्याला बाहेरून खंदक असावा तसा सुंदरनगराच्या कडेकडेने एक नाला वाहत होता. काळ्याकभिन्न नागड्या कातळावर हजारो झोपड्या अस्ताव्यस्त पसरलेल्या होत्या. संध्याकाळ! दिवेलागणीची वेळ झाली होती. वस्तीवर अंधार पसरत होता. झोपड्यांच्या छपरातून धुराचे लोट बाहेर पडत होते. नाल्यावर एक नव्याने बांधलेला पूल होता. पुलाच्या कठड्यावर पाचसहा शिलेदार सिग्रेटी फुंकत बसले होते. मकरंदला पाहताच ते चटकन उभे राहिले आणि सलाम ठोकत त्यांनी खडी ताजीम दिली. मकरंदचा वस्तीवर किती वचक होता ते त्यांच्या भयभीत चर्येवरून स्पष्ट दिसत होते. "काय भिवऱ्या, डिलिव्हरी झाली का आजची?" "झाली, दादा!" फुलांफुलांचा शर्ट घातलेला एक झिपऱ्या उद्गारला. "किती?" "तीन ट्रक गेले दादा." "आणि पोलिस आलेत का बंदोबस्ताला?" मकरंद. "पाच-सहा जणं आल्यात. आणि येतील पंधरा जणं." भिवऱ्या. "बर, आता इथे बसून बिड्या फुंकू नका... देवळात जा. पूजेची तयारी करा. तासाभरात येतीलच भाऊ. काय? चला निघा."
तसे सगळेजण वस्तीकडे पसार झाले. वस्ती म्हणजे टीनच्या पत्र्याच्या, कुडाच्या आणि काही विटांच्या झोपड्या होत्या. काही टपरीवजा दुकानंही होती.मधून जाणारे बोळ काम गटारे. प्रत्येक झोपडीचे सांडपाणी त्या रस्त्यांवरून वाहत होते आणि नाल्यात विसर्जित होत होते. इथले रहिवासी आपली पाण्याशी संबंधित नित्य नैमित्तिक कार्ये बहुतेक रस्त्यांवरच करत असावेत.
आम्ही जात होतो तो रस्ताही फारतर दहा फूट रुंदीचा होता. त्यातूनच रिक्षा, सायकली, मोटरसायकली, हातगाड्या येत जात होत्या. पण मकरंदाला पाहताच सगळेजण रस्त्याच्या कडेला सरकून आम्हाला वाट करून देत होते, वंजारी भाषेत कलकल भांडणाऱ्या बायका एकदम चिडीचूप होत होत्या, रस्त्याच्या कडेला पोटे साफ करणारी पोरे झोपडीत पळून जात होती. "आत राधाकृष्णाचं मंदिर बांधलंय भाऊने. दर अमावास्येला पूजा करतात भाऊ. ते नसले तर मी. आजची पूजा तर फार महत्त्वाची असते - वर्षातली सर्वात मोठी." मकरंदाने माहिती पुरवली.
मध्येच तो एका बोळात शिरला. एका मोठ्या झोपडीच्या बाहेर धिप्पाड शरीराचे दोन पहारेकरी उभे होते. त्यांच्या कमरेला पिस्तुलंही खोचलेली होती. मकरंदाला पाहताच ते बाजूला झाले. मकरंद त्या झोपडीत शिरला. आम्ही बाहेरच थांबलो. तो आत जाताच आतले दिवे लागले. मग दोन मिनिटात तो पुन्हा बाहेर आला आणि म्हणाला, "या, आत या...बसा, बसा." आम्ही आत शिरलो. ती झोपडी नसून बाहेरून झोपडीचा आकार दिलेला एक मोठा हॉल होता. एक गोड, आंबूस वास तरळत होता. आत वीसेक माणसे काम करत होती. मधोमध एक बॉईलर धगधगत होता. त्यावर तांब्याच्या बऱ्याच नळ्या असलेले कसलेसे भांडे होते. एका बाजूला चारपाच खुर्च्या मांडलेल्या होत्या."ही आमची भट्टी. दररोज इथे दोन हजार बाटल्या तयार होतात. अशा चार भट्ट्या आहेत अजून. " "बरंच मोठं दिसतंय की..." राजा एका खुर्चीवर बसत म्हणाला. "म्हणजे? हातभट्टी म्हणतात ती अशी असते काय? मग ते टायर, बॅटऱ्या, गंजलेली पिपं, नवसागर - ते कुठं आहे?" माझ्या डोळ्यासमोर सिनेमात किंवा पेपरातल्या फोटोतल्या हातभट्टीचे चित्र होते. पण हा तर भलताच सॉफिस्टिकेटेड प्रकार दिसत होता. "ते दिवस गेले. दहा-बारा वर्षापूर्वी इथे अशाच भट्ट्या होत्या. आता त्या भट्ट्या आम्ही पोलिसांच्या रेडसाठी राखून ठेवल्या आहेत. पोलिस लोक येतात, ती पिपं फोडतात, टायरी जप्त करतात, काही लोकांना पकडतात आणि पेपरात फोटो देतात. लोकांना वाटतं - चला, एक हातभट्टी उध्वस्त झाली. पण ते नाटक असत रें. आमची माणसं लगेच जामिनावर सुटतात. खरी भट्टी इथं आहे. ही तोडली तर आमचं फार नुकसान होईल. म्हणून लुटुपुटूच्या भट्ट्या तोडतो." "मग सरळ देशी दारूचा परवाना घेऊन त्याची डिस्टिलरी काढायची. असं चोरून कशाला?" "तेसुद्धा आहेच. आता भाऊंची डिस्टिलरी येतेय इंदापूरला. पण लोकांना स्वस्तात हवी असते. दोन-तीन रुपयात चपटी बाटली. आणि काही शौकिन तर फक्त हातभट्टी पितात - तुला सांगतो, आमचा एक खास माणूस पुण्यातल्या काही बड्या माणसांकडे दररोज पोच करून येतो. त्यात डॉक्टर्स आहेत, पुढारी आहेत, वकीलसुद्धा आहेत - आणि हे काही चोरून नाही. सगळ्यांना माहीत आहे. पुण्याच्या बाजारपेठेतला खराब झालेला सग्गळा गूळ इकडे येतो - राजरोस. मीच मॅनेज करतो ना हा धंदा!" मकरंद बिनधास्त सांगत होता. "तू?" "का? काय झालं? उलट मी आल्यामुळे आता सगळं स्वच्छ झालं. लोकांना चांगली दारू तरी प्यायला मिळेल. पिऊ नका म्हणून कितीही सांगितलं तरी लोक प्यायची सोडणार नाहीत हे त्रिकालाबाधित सत्य! आणि गरीब माणसाला हीच परवडणार. मग निदान चांगल्या क्वालिटीची तरी असावी ना? आणि हातभट्टी म्हणजे काय रे? जरा विचार कर, अरे आपल्याकडेही या धंद्याकडे नीट पाहिलं असतं लोकांनी तर आपणही पाचशे वर्षापूर्वीच्या दारूच्या बाटल्या आज विकल्या असत्या - वेरूई ओल्ड व्हॅटेड! आपल्याकडे हा व्यवसाय केला तर हातभट्टी आणि तोच इंग्लंड -अमेरिकेत केला तर ते स्कॉच- बर्बन काय? जाऊ दे! हिप्पोक्रसी दाय नेम इज इंडिया!" मकरंदच्या आवाजात त्वेष होता. "पण व्यसनाधीन होणाऱ्यांच्या आयुष्याची परवड होते....कामातनं जातात ती!" "तो एक स्वतंत्र विषय आहे. तू सांग राजा मला.. दारू कुठेही मिळते - उघड - दुकानात, बारमधे. तुझ्याकडे पैसेही असतात बऱ्यापैकी. पीत असशील अधूनमधून.. पण तू झालास का व्यसनाधीन? भाऊ तर माळकरी आहेत. दारूचा थेंबही चाखत नाहीत. बाहेरदेशातली माणसं सर्रास वाईन पितात - पाण्यासारखी. ती काय सगळी देशोधडीला लागतात काय? आपल्याकडे मात्र - 'एकच प्याला' - एकदा दारू चाखली की संपलंच सगळं! मला तर कधी कधी वाटतं - दारू निषिद्ध मानल्यामुळेच लोकांना तिचं प्रचंड आकर्षण आहे. लोकांना दारू प्यायला शिकवण्याची गरज नाहीच मुळी. गरज आहे ती किती प्यावी हे शिकवण्याची...अरे, व्यसनाधीन होणाऱ्या माणसाला कळतच नसतं तो काय करतोय ते! तो एक मनोरुग्ण असतो. दारू हे फक्त एक निमित्त असतं - त्याला आयुष्याची किंमत नसते." "पण काही झालं तरी दारू ही काही गरज नाही माणसाची. पण एकदा दारू प्यायला लागल्यावर मात्र ती गरज बनते. तुला कशीं कळणार एखाद्या दारुड्याची परिस्थिती? तू कधी झालायस व्यसनाधीन?" मी त्याला विचारले.
तो एकदम गप्प झाला. त्याच्या चेहऱ्यावर विषण्णतेचे भाव पसरत गेले. " विसू, मी इथे आलो याचं कारण हेच. मी एक ठार वाया गेलेला दारुडा होतो - वयाच्या बाविसाव्या वर्षी! सकाळी उठल्यापासून रात्री बेशुद्ध होईपर्यंत दारू पीत होतो. या भाऊचा खून करायचा होता मला. का? तर माझी मोठी बहीण पळून गेली त्याच्या बरोबर. एका दारू गाळणाऱ्या वंजारी पोराचा हात धरून कोकणस्थ मुलगी पळून गेली. लग्न केलं आणि त्याच्याबरोबर या झोपडपट्टीत राहायला लागली माझी सख्खी बहीण - राजरोस. लोक शेण घालायला लागले तोंडात. सहन नाही झालं मला. भाऊचा खून करायचा एवढंच डोक्यात. पण ते शक्य नाही हे लवकरच कळून चुकलं. म्हणून दुःख बुडवण्यासाठी बेदम दारू प्यायचो. मग ते दुःख बाजूला राहिलं आणि फक्त दारू उरली."
त्याच्या डोळ्यासमोर भूतकाळातली दृश्यं तरळत असावीत - मकरंद बोलतच होता - त्याच्या घरच्यांची अवस्था - मुलगी पळून गेलेली, हातातोंडाशी आलेला इंजिनियर मुलगा दारूपायी मरणपंथाला लागलेला... ऐकताना मी बधिर झालो होतो.राजाही थक्क झाला होता.. "संपलंच होतं सगळं. पण पुढं याच भाऊनं मला परत माणसात आणलं. एकदा असाच झिंगून पडलो होतो. मयुराला कळलं ते. मग भाऊनं मला उचलून आणलं रस्त्यातून. इथं एका झोपडीत दोन महिने बांधून घातलं. मग माळ घातली. माणसात आणला मला. नाहीतर मी कधीच मेलो असतो - लिव्हर फाटून किंवा एखाद्या ट्रकखाली येऊन." मकरंद आता शांतपणे बोलत होता."आता वाटतं, आपलीच मतं किती कोती असतात. आपल्या झापडातून दिसला तोच एकमेव रस्ता. आपल्या डोक्यात मावलं तेवढंच आपलं जग. इथे आल्यावर कळलं की खरं जग आपण पाहिलंच नाही. माझा नवीन जन्मच झाला म्हणा ना! आमच्या गल्लीतले लोक म्हणायचे - पोरगी पळून गेली, पोरगा कामातून गेला - पण आता? कुणाच्या तोंडून चकार शब्द निघत नाही. टापच नाही. मी नुसता आलोय म्हटलं की बोबडी वळते. आणि भाऊंच्या तर आरत्या ओवाळतात ते. ताई सुंदरनगराची नगरसेविका म्हणून बिनविरोध निवडून आली तेव्हा तर सत्कार केला ह्याच लोकांनी तिचा - आहेस कुठं? " "अरे, बोलता, बोलता किती वेळ गेला... चला, ताई वाट पाहत असेल!" मग भानावर येत आम्ही निघालो.
पंधरा मिनिटात मकरंदचा सारा जीवनपट आमच्यासमोर उलगडला होता. काय बोलावं ते सुचत नव्हतं. पण थक्क होऊन शुद्ध हरपण्याची वेळ आली ती सुंदराताई उर्फ मयुराच्या झोपडीवजा घरात! त्या गिचमिड वस्तीतही या झोपडीच्या चारी बाजूंनी मात्र प्रशस्त जागा होती. समोर अंगण होते. अंगणात तुळस होती. भिंतीपासून काही अंतर सोडून चारी बाजूंनी फुलझाडांच्या रांगा होत्या. मागच्या बाजूला अंधारात अस्ताव्यस्त पसरलेले चिंचेचे की तसलेच कसले मोठे झाड असावे. एका बाजूला छप्पर वाढवून उघड्यावर बसण्यासाठी पडवी केलेली होती. ती झोपडी बघून एकदम मला चित्रात पाहिलेल्या ऋषिमुनींच्या पुराणकालीन आश्रमाची आठवण झाली. फक्त हरीण आणि मोर सोडले तर त्या चित्रातले सारे काही तिथे होते. दिवाळी म्हणून बाहेरून लाईटच्या माळांची रोषणाई होती. झोपडीसमोर सारवलेल्या अंगणात भलीमोठी रांगोळी काढलेली होती. दाराशी काही टोपल्या भरून फटाके ठेवलेले होते आणि नवीन कपडे घातलेली लहान लहान मुलं मनसोक्त फटाके उडवत होती. सारवलेल्या भिंतीच्या कडेने आणि कोनाड्यात पणत्यांच्या रांगा तेवत होत्या. "ताई, आम्ही आलोय बरंका," अशी वर्दी देत मकरंद आत शिरला. त्याच्यामागे आम्हीही. "बसा, बसा! आलेच मी..." आतून आवाज आला. झोपडी कसली तो एक बंगलाच होता - चार खोल्यांचा. दिसायला झोपडीसारखा असला तरी आतून राजमहालच होता तो. एक एअरकंडिशन्ड झोपडी मी पहिल्यांदाच पहात होतो. आत एखाद्या ऐतिहासिक चित्रपटात शोभेलसे मोजकेच पण कलात्मक फर्निचर होते. नक्षीकाम केलेल्या शिसवी खुर्च्या, एका बाजूला उभ्या काचा बसवलेले अनेक मराठी, इंग्रजी पुस्तकांनी भरलेले लाकडी कपाट, एक छोटेखानी सुबक टेबल. त्या बैठकीच्या खोलीत उच्चभ्रू साधेपणा म्हणतात तो अगदी ओतप्रोत भरलेला होता. "काय? कशी वाटली आमची झोपडी?" समोर साक्षात मयुरा ऊर्फ सुंदरनगरची सम्राज्ञी उभी होती - सुंदराताई! चेहरा सुंदर, सोज्ज्वळ, हसतमुख - आपल्या सामर्थ्याची, अधिकाराची कुठलीच जाणीव तिच्या शांत मुद्रेवर नव्हती. एखाद्या सर्वसामान्य गृहिणीप्रमाणे ती दिसत होती. लक्ष्मीपूजनासाठी थोडी सजली होती एवढेच. तिच्या हातात फराळाचं ताट होतं. "छान आहे.. अगदी एखाद्या आश्रमात आल्यासारखं वाटतंय!" मी. "आमच्याकडे आला नाहीत तुम्ही जेवायला.. घ्या, फराळ तरी करा आता." "ताई, तिकडं सुरेखाताईंनी फार आग्रह केला. पोट गच्च झालंय! " राजा पोटावरून हात फिरवत म्हणाला. "एवढ्याशा फराळानं काय होतंय... घ्या, घ्या - बघा तरी मला जमलंय का फराळाचं करायला!" "की लाडू फोडायला हातोडा लागतोय?" मकरंदने बहिणीची खोडी काढली. "असले फालतू, जुनाट विनोद करू नकोस. ते हातोड्यानं फोडायचे लाडू काढून ठेवलेत तुझ्यासाठी. भाऊबिजेला देईन फराळात.." मयुरा.
बकाल सुंदरनगरातल्या एका 'झोपडी'त भावाबहिणीचा तो गंमतीदार संवाद किती विसंगत होता!! क्षणभर आपण पेठेतल्या एखाद्या वाड्यात आहोत असा भास झाला. पोटात जराही जागा नव्हती तरी आम्ही बळेबळे दोन घास खाल्ले. "छान झालंय फराळाचं हां. चला, येतो आम्ही..." राजाला आता परतीचे वेध लागले होते. "एवढ्यात कुठं जाताय? आता पूजा आहे देवळात... ती झाली की मग निघा सावकाश." मयुरा आर्जवानं म्हणाली. "ताई, त्यांना घेऊन पुढे होतो. तू ये नंतर," मकरंद उठला. "निघताय? बरं... आता पुढच्या वेळेला आलात की माझ्याकडं यायचं जेवायला आठवणीनं!" मयुरानं आम्हाला निरोप दिला.
शेजारच्या एका झोपडीसमोर थांबून मकरंद म्हणाला," ही आमची ट्रेझरी. आमच्या टेरिटरीचं सगळं बुकिंग इथं जमा होतं आणि इथूनच मागेपुढे जातं..." "समजलं नाही मला", त्याचं बोलणं मला काहीच कळलं नव्हतं. "विश्या, बुकिंग म्हणजे आकड्याचं रे!" राजा वैतागला होता. "त्याला मी प्रायव्हेट लॉटरी म्हणतो." मकरंद म्हणाला. "खासगी लॉटरीच आहे ही. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र - ही आमची टेरीटरी. कल्याण आणि मुंबई मटक्याबरोबरच आमचाही स्वतःचा वेगळा बिझनेस आहे - पूना मटका." "आता या धंद्यासाठीही तुझ्याकडं स्पष्टीकरण असणार!" मी हसत म्हटलं. आता निर्ढावलो होतो. "विसू, तुला हे सगळं वाईट दिसतंय कारण तू स्वतःला वेगळा समजतोस. त्यात तुझा काही दोष नाही. तुझं जग फार वेगळं आहे रे. तुला यातला काही अनुभव नाही. घेण्याची गरजही नाही. लांबून पहायचं आणि म्हणायचं - हे वाईट, ते वाईट. फार सोपं आहे तसं म्हणणं. पण फक्त फुकाच्या गपा आहेत त्या. या जगात दारू, जुगार, बाई या गोष्टी अगदी पुराण काळापासून होत्या, आहेत आणि यापुढेही असणार. हे कितीही वाईट म्हटलं तरी ते एक निखळ सत्य आहे." "ते मलाही माहीत आहे. पण म्हणून ते मान्य करून त्याला प्रतिष्ठा द्यायची?" मी दाबून बोलत होतो. मकरंद हसला, म्हणाला, "प्रतिष्ठा मिळवून द्यायची काय गरज आहे रे? आज तू इथे आहेस म्हणून बोलतोय्स. उद्या तिकडे अमेरिकेत गेलास आणि चार पैसे खुळखुळायला लागले खिषात की तू ही जाशीलच ना "लास व्हेगास"ला - एंजॉय करायला? तिथे बघशील, अरे जगाच्या नाड्या हातात असलेले सुप्रसिद्ध, प्रतिष्ठीत लोक येतात तिथे - करमणूक करून घ्यायला." "त्यांच्याकडे भलेही भरपूर पैसा असेल पण सुसंस्कॄतपणा? रानटी लोक असतात सगळे.." मलाही आवेश आवरत नव्हता.
मकरंदाच्या स्वरात कडवटपणा उतरला होता, "सुसंस्कृतपणा? काय असतो रे तो? मुलगी पळून गेली म्हणून थुंकणारे सुसंस्कॄत? मुलगा वाया गेला म्हणून कोरडी सहानुभूती दाखवणारे आणि मागे कुत्सितपणे हसणारे सुसंस्कृत? माझे वडील हाय खाऊन पॅरालिसिस होऊन पडले तर कोणी हॉस्पिटलमध्ये न्यायला आलं नाही बरोबर. म्हणे सुसंस्कृत! या लोकांच्या सुसंस्कृतपणाच्या व्याख्याही किती लवचिक! वा! ताई नगरसेविका झाली की ती सन्माननीय, भाऊने गणेशोत्सवाला पाच लाख दिले की तो दानशूर, सुविद्य नागरिक! मी तर काय म्हणे तरुणाईचे आशास्थान! तीन महिन्यापूर्वी वडील वारले तर अंतयात्रेला मात्र ही गर्दी. वैकुंठावर भाषणं केली लोकांनी - पुरोगामी विचारांचे, दूरदृष्टीचे , सुजाण आणि काय काय... आपल्या मुलीच्या आंतरजातीय विवाहाला मान्यता देवून त्यांनी नव्या समाजरचनेचा पाया घातला - असा साक्षात्कार झाला तुझ्या या सुसंस्कृत लोकांना!" "तुला एक जगाचा वाईट अनुभव आला म्हणून सगळ्यांना एकाच रांगेत उभे करणार काय तू?" मी "विश्या, लेका बास की आता, आं?" राजा मला आडवत म्हणाला. "राजा, बोलू दे त्याला. विसू, मीही तुझ्यासारखाच विचार करायचो रे. आयुष्य सुरळीत सुरू असलं ना की आपण किती सुसंस्कृत आहोत ते दाखवण्याचा सोस असतो प्रत्येकाला. मलाही होता. मीसुद्धा ताईच्या लग्नाला विरोधच केला की रे... पण कोण आलं माझ्या मदतीला? घेऊन येऊ तिला परत म्हणालो, कुण्णी पुढं आलं नाही. “आता काय फायदा? तिचं लग्नही झालं असेल”, “शेण खायच्या अगोदरच आवरलं असतं तर बरं झालं असतं - आता मारामाऱ्या करून काय मिळणार?” - हे उद्गार. हे कसले मारामाऱ्या करणार? - हे नुसते मार खाणार. आणि मी कामातनं गेलो तेव्हा कोणी मला सावरायला आलं? “चला, मुलगी पळून गेली, साठ्यांचा मुलगाही आता...' " मकरंद एकदम थांबला.,"सगळे एका माळेचे मणी !" "पण आदर्शवादी, ध्येयवेडी माणसं असतातच की जगात!" "असतात रे विसू.. म्हणूनच त्यांना वेडे म्हणतात. त्यांना तरी कुठे तुझा सुसंस्कृत समाज डोक्यावर घेतो? एकतर दुर्लक्ष करतो नाहीतर वेडे ठरवून दगड, शेण मारतो. सुसंस्कृत म्हणजे सगळे कातडीबचाऊ शहाणे. आणि मुळात सभ्य, सुसंस्कृत म्हणवणाऱ्या समाजाला काय चांगलं, काय वाईट ठरवण्याचा अधिकार दिला कुणी? दुसऱ्याच्या पोळीवर पडणारं तूप ओढून घ्यायला धडपडणारी ती माणसं. मी दहावीला बोर्डात आलो तेव्हा शेजारी दुःस्वासानं जळफळत होते. पण मी दारू प्यायला लागल्यावर आनंदानं हुरळून गेले सगळे. असल्या सुसंस्कृत माणसांपेक्षा इथली असंस्कृत, रानटी, गुंड माणसं बरी की! जीव घेतात कधीकधी पण जीवाला जीव देतातही. या झोपडीत आत्ताच्या क्षणी जवळजवळ ऐंशी लाख रुपये पडलेत - कॅश! वस्तीतल्या प्रत्येकाला माहीत आहे. पण कुणी इकडे ढुंकूनही बघत नाही. ही माणसं असंस्कृत?... जाऊ दे. तुला कळणार नाही मी काय म्हणतोय ते! ते कळायला तशी वेळ यावी लागते माणसावर.." त्याने चर्चेला पूर्णविराम दिला.
त्याच्या वैयक्तिक अनुभवांनी त्याला फारच कडवट बनवला होता. खवळलेला मकरंद एकदम भरभरा चालू लागला - आम्ही त्याच्या मागोमाग मुकाट्याने.
* * * *

एक दिवाळी अशीही येते-७

मारुती वाहनामधून कँपात चक्कर मारली. मग परत येऊन मस्तपैकी जेवलो. ही मेजवानी खास भाऊंच्या घरातील डायनिंग हॉलमध्ये होती. बारा खुर्च्या असलेलं लांब, शिसवी टेबल; बारीक कोरीवकाम केलेल्या राजेशाही खुर्च्या; टेबलाच्या मधोमध फ्लोरल डेको... पंचविशीतली एक सुंदर तरुणी वेटरना ऑर्डर्स सोडत होती. "नमस्ते, मी सुरेखा...आन्नानी फोन क्येलता मला. धाकली भैन मी त्यांची. बसा, बसा..." म्हणजे ही भाऊंची दुसरी बायको! "आमी वंजाऱ्याचं - तुमी बामनाचं! तुमाला चालंल - नाय चालंल म्हून तिक्डं सुंदराताईकडं ज्येवाला पाठवायचं म्हनत होते आमचे साहेब. पर म्याच म्हनलं, माझ्या म्हायेराची मान्सं हायती.. तवा माझ्याकडं जेऊं देत - सम्दं केलंया - भात-भाजी-आमटी- म्या शिकलोय आता सुंदराताईकड्नं बामनावानी सैपाक करायला. सायेबांना आवडतं ना! आनि ते दुसरं - खारंबी आहे, बर्का!. तुम्हाला पायजे ते सांगा." 'म्हायेराची - भावाची मान्सं' आल्याने ती बहीण काय करू-काय नको असं करत होती.
"मला चालेल," मी स्थितप्रज्ञाप्रमाणे म्हणालो. राजा मात्र बिचारा आपल्या ब्राह्मण धर्माला जागत होता.
त्याच्यासाठी भात-आमटी-कोशिंबीर- लोणचे - चपाती -भाजी हे घासफूस तर माझ्यासमोर चिकन सूप, बटर चिकन, मटन मसाला, बटर नान, फिश बिर्यानी...असे शाही - पदार्थ येतच होते. तेव्हा ठरवून टाकलं, आता जे जे होईल ते फक्त पाहत राहायचं. म्हणजे- आता जे जे येईल ते ते खायचं - पोटाचा फारसा विचार करायचा नाही. फार डोकं चालवायचं नाही. नाहीतरी ते आतापर्यंत बधिर झालंच होतं. "कसं झालंया?" सुरेखा विचारत होती. "मस्त! फस्कलास!" राजा "आमच्या आन्नाला सांगा बरंका. न्हाई, त्याला माज्या सैपाकाची लै काळजी- कशी करंल म्हून ," सुरेखा खुश होती. "अगदी नक्की सांगीन - आन्ना , तुमची भईन बामनाच्या तोंडात मारंल असा सैपाक करती.." राजा कौतुकाने म्हणाला तशी ती आणखी आनंदित झाली. "आणि तुम्ही घरसुद्धा मस्त ठेवलंय हं," मी पुस्ती जोडली. "व्हय तर! त्या सुंदरनगरात ऱ्हान्यापरीस हितं ऱ्हाऊ म्हनून म्याच म्हनले सायबास्नी. पर सुंदराताई न्हाई म्हनाली. ती तितंच ऱ्हाते - वस्तीवर. तिचीच हाय न्हवं ती!" एक तक्रारवजा कौतुक डोकावत होतं. "सायेबांनी मग ही बिल्डिंग घिऊन दिली मला. हितं कसं निवांत हाय. कसली झगझग न्हाई." आम्ही हात धुऊन उठलो तेवढ्यात फोन वाजला. "सायेब आलेत हापिसात. बलिवलंय तुमास्नी. गाडी घिऊन जाईल तुम्हाला..." सुरेखा म्हणाली. "बरंय! येतो ताई!" राजानं निरोप घेतला.
व्हॅनमधून आम्ही 'मयुरी फिल्म्स इंटरनॅशनल प्रा. लि.' अशी पाटी लावलेल्या एका दुकानगाळ्यासमोर उतरलो. तो एक दुमजली गाळा होता. खालच्या मजल्यावर काही पोचलेले दिसणारे तरुण बियर पीत बसले होते. जवळजवळ प्रत्येकाची शर्टाची वरची बटणे उघडी होती.
आम्ही आत गेल्यावर आमची कसून 'चाचपणी' झाली. मगच वरच्या मजल्यावर जाण्याचा क्लिअरन्स मिळाला. वरच्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्याची शेवटची पायरी चढलो आणि तिथेच थबकलो. तो मजला एखादा रंगमहाल सजवावा तसा सजवला होता. सगळीकडे रंगांची उधळणं होती. भिंती वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेल्या, खिडक्यांना निळ्या, लाल, पिवळ्या काचा, प्रत्येक खिडकीला आणि गॅलरीला सात आठ रंगांचे लांबसडक पडदे, छताला रंगीबेरंगी लोलकांचं प्रचंड झुंबर, खाली लालभडक गालिचा, मध्ये बरीच मोकळी जागा, दोन्ही बाजूंना कोचांची रांग आणि मागे एक लाकडी झोपाळा. त्या झोपाळ्यावर भाऊसाहेब झुलत बसले होते. झोपाळ्यावर बाजूलाच एक पिस्तूल होतं - हातासरशी. वय साधारण पस्तीस, लालसर गोरा वर्ण, पसरट, गुबगुबीत चेहरा, डबल हनुवट, सरळ, लांब नाक, खुरटलेली दाढी, काना-खांद्यावर रुळणारे कुरळे केस, रुंद खांदे, जाडजूड हात, जाड भुवया आणि भेदक नजर. "या, या... गाववाले... या बसा..." भाऊ आपल्या खर्जात. भाऊ त्या रंगमहालात विसंगत दिसत होते. त्यांनी एक सफेद शर्ट आणि सफेद पँट घातली होती.
माझी नजर त्या पिस्तुलावर रोखलेली पाहून त्यांनी स्मितहास्य केलं आणि ते पिस्तूल उचलून कमरेला मागे खोचलं,"ठेवावं लागतं, बाबा..."
त्याबरोबर उपस्थित मंडळींच्या अनुमोदक हास्याची लकेर उमटली. तिथे चार-पाच मंडळी बसली होती. त्यातच मकरंदही होता. आम्हीही अंग चोरून बसलो. "तो दोस्तलोग, ये हमारे राजासाब और विश्वनाथसाब... हमारे गांवसे आये है!" भाऊसाहेबानी आमची ओळख करून दिली. माझा विश्वासचा विश्वनाथ झाला. असो. "और ये - आमचे डायरेक्टर - शानीसाब आणि रायटर - शर्मासाब - आम्ही फिल्म काडतोय - 'रावण की लंका' नावाची. - त्याचे." शानी किंवा साहनी - जो कोणी असेल तो- एक पन्नाशीला पोचलेला, अर्धवट टक्कल पडलेला, बसक्या बांध्याचा इसम होता तर शर्मा तिशीचा, गोरापान तरूण होता. त्याचीही अवस्था माझ्याहून वेगळी नसावी. त्याच्याही डोळ्यात बळी व्हायला निघालेल्या कोकराचे भाव दिसत होते. "शानीसाब, ये विश्वनाथसाब मराठीके बहुत अच्छे रायटर है हां..." मकरंदने पुस्ती जोडली, "उधर बहुत नाम है इनका!" मी थक्क! एकतर ह्या भल्या गृहस्थाला मी काहीबाही लिहितो हे कळले कसे? आणि वर "मेरा नाम है हे मेरेकुच मालूम नाही?" "क्या साठेसाब? ऐसा कुछ खास नही लिखता मै!" मी ओशाळून म्हणालो. "नय, नय! बहुत अच्छा लिखते है हां!" आता भाऊसाहेबच म्हणतात तर मी काय बोलणार? "ऐसा करो -आपकी स्टोरी इन्को सुनाव! क्या, शर्मासाब... इनको पसंत आयी ना तो फायनल कर डालेंगे - क्या?" भाऊ एका दमात म्हणाले.
मी आता पार कामातूनच गेलो होतो. एक क्षणभर माझ्यासमोर राजाच्या गॅरेजमधले ते मोटोक्रॉसचे चित्र तरळून गेले. त्या एका चित्राच्या दर्शनाने मला हे काय-काय पाहायला मिळत होते! माझ्या रुकारावर एका हिंदी चित्रपटाची कथा निश्चित होणार होती!!?? मला तर ती सगळी चेष्टाच वाटायला लागली. "प्लीज, एकबार आप सुन लिजिये ना साहब! बहोत पसंद आयेगी आपको..." शर्मा मलाच अजिजी करू लागला. खुद्द फायनान्सर - प्रोड्युसरच सांगतोय म्हटल्यावर शर्मासाहेबाला ती स्टोरी माझ्यासारख्या गाढवापुढे सांगणे भागच होते. "पण भाऊसाहेब, आमचे काम... मोटोक्रॉसच्या गाड्या, ते रायडर..."मी चाचरत म्हणालो. "इकडे रायटरचं फायनल झालं की तिकडे रायडरचं फायनल झालंच म्हणून समजा..." भाऊ आपल्या कोटीवर खूश होऊन हासले तसे साऱ्यांना हसावेच लागले. "विश्वास, अरे ऐक रे एकदा!" राजा अत्यंत जबाबदारीने शब्द उच्चारत म्हणाला. विश्याचा विश्वास! आता मात्र मला त्याची कथा ऐकणे भागच होते. "ठीक आहे," मी तयारी दाखवली. "ठैरो! अरे सँडी, एक पाच-सहा बियर आणि काजू लेकर आव!" मकरंदने फर्मान सोडले तसा सांडासारखा माजलेला सँडी बाटल्या, काजू आणि ग्लास घेऊन आला...,"हा, अब शुरू करो..." मग बियरचे घुटके घेत घेत एका होऊ घातलेल्या हिंदी चित्रपटाच्या कथेचे पारायण सुरू झाले. मी मात्र सोवळ्यात होतो. गंमत म्हणजे की माझ्याप्रमाणेच भाऊ आणि मकरंद दोघेही बियर घेत नव्हते. शर्मा मन लावून कथा सांगत होता. कथा अगदी तद्दन भिकार किंवा फालतू होती. (मिथुन किंवा गोविंदाच्या कोणत्याही चित्रपटाला शोभेलशी) तथाकथित 'अन्यायाविरुद्ध लढा' किंवा 'दुष्टप्रवृत्तीवर सुष्टांचा विजय' या पठडीची कथा! त्यात रंगवण्यासारखे काय होते ते त्या शर्मालाच माहीत.
पण जसजशा बाटल्या संपू लागल्या तसतसा तो स्वतःच रंगात येऊ लागला. "यहांपे एक गाना डालेंगे..”, “आहा, क्या शॉट बनेगा ये!”, “तो क्या होता है के...”, “उसकी मां केहती है बेटा, तुझे मेरी सौगंध है, जला डाल इस रावन की लंका को”, “इधर वो जो हिरोकी बहेन है...” , “और वो क्या देखता है...” अशी वाक्ये हातवारे करत तो मला सुनावू लागला. मीही "वा, क्या बात है!", "सुपर्ब", "जबरदस्त ट्विस्ट है ये तो" अशा घोषणा करून मी त्याची कथा ऐकतो आहे याची खात्री देत होतो. तो प्रसंग फारफार विनोदी दिसत असणार. दहा रुपयांना मिळणाऱ्या हिंदी पॉकेटबुकातसुद्धा यापेक्षा काही नवी सापडले असते. पण शानीसाहेबाला मात्र कथेतला 'जर्म' पुरेपूर कळला होता. तो बसल्याबसल्या अंगात आल्यासारखा वळवळत होता. त्याच्यातला दिग्दर्शक कथेला, "वा!वा!”, “क्लोजप लेंगे यहां पे”, “ये शॉट के लिए मेरेपास भोत अच्छा लोकेशन है” वगैरे दाद देत होता. "और फिर हिरोकी मा केहती है,- जब, जब कोई रावन पैदा होता है , उसकी लंकाको मिट्टीमे मिलाने के लिए कोई रामभी पैदा होता है - दी एंड"... लालबुंद झालेल्या चेहऱ्याचा शर्मा विजयी मुद्रेने माझ्याकडे पाहत होता. जणू त्यानेच रावणाची लंका जाळून टाकली होती. चांगले दोन तास बडबड करून तो दमला होता आणि ती ऐकून मीही. "कैसी लगी, साब?" त्याला हा चित्रपट गेलाबाजार सिल्व्हर जुबिली तरी करणार याची खात्री वाटत असावी.मी हळूच एक नजर भाऊ आणि मकरंदकडे टाकली. भाऊ माझ्याकडे मोठ्या अपेक्षेने तर मकरंद मिस्किलपणे पाहत होते. "अच्छी हे! लेकीन और आच्ची हो सक्ती है. " मी गंभीरपणे म्हटले. मग उगाचच काही निरर्थक सूचना केल्या..." “वो हिरोकी बहेन हे ना वो भौत लेट आती हे स्टोरी में. उसका और हिरोका इमोशनल बॉँडिंग दिखाने के लिये थोडा जल्दी लाना चाहिये उसको...”, “और हिरो का दोस्त का कॅरेक्टर कुच जमा नही. वो नही रहेगा तो भी चलेगा ना?”, “वो व्हीलन च्युइंग गम खाणेवाला दिखाया तो मजा आयेगा...”, “सिग्रेट पिनेवाले व्हीलन तो भौत हो गये ना!" मी माझी अक्कल पाजळत होतो आणि अर्थातच लेखक आणि दिग्दर्शकाला ते लगेच पटत होते. "वा! वा! क्या विशनाथ साब... आपको तो बंबईमे होना चाहिये.. गांवमें क्या कर रहे है आप? कोई इस्टोरी है तो सुनावो. एक पिक्चर बना डालेंगे" शानी मला मस्का मारत होता. "कशी काय वाटली?" भाऊ विचारत होते. "मला तरी बरी वाटली. पण तुम्ही अजून कुणाला तरी विचारले तर बरे होईल," मी माझी जबाबदारी झटकत म्हणालो. "किती बजेट आहे?" राजाने पृच्छा केली. "आहे दोन-तीन कोटींचं ," मकरंद सहजपणे म्हणाला. "जास्त लागले तर पाहू..." भाऊ म्हणाले. "आच्छा, ठिक है शर्मासाब, नेक्श्ट टाईम फायनल बोलेंगे. और शानीसाब, हिरो बोलेतो कौन आयेगा वो देखो तो जरा..." "आप बोलो, किसको लेंगे..., आपका खाली नाम बताया तो कोईभी आएगा भाऊसाब"शानी हसत म्हणाला. "और हां...एक बात बताना तो मै भूलही गया! ये लोग उधर गांवमें एक मोटरसायकल रेस करनेवाले है... कुछ स्टंटमन का बंदोबस्त करो.. सबको बोलो, भाऊका घरका काम है.. एकदम फस्क्लास जंप मारनेका उधर जाके...सब लोगको मजा आना मंगता, क्या?" भाऊंनी आदेश दिला. "जी साहब, आजही बीस-पच्चीस मोटरसायकलवालोंको बोल के रखता हूं," शानी. "उनको बोलो, भाऊ का ट्रक आयेगा, उसमे गाडिया डाल्के हमारे गावको चले जाव..हरेक को दो - दो हज्जार मिलेगा. लेकिन पाच तारिख को सब लोग उधर चाहिये. नय तो भाऊ देख लेगा एक-एक को. क्या?" भाऊ पिस्तूल काढून कुरवाळू लागले. "उसकी जरूरत नय, भाऊसाब... पैसा क्या चाटनेका है? मै खाली आपका नाम बोलता हूं - बस! सब सिधे चले जायेंगे." शानीचा असिस्टंट डिरेक्टर ऊर्फ चमचा म्हणाला. "ऐसा करो, इनका नाम, पता, फोन नं. लिख लो. बंबई बात होते की फोन करो इनको. क्या?" मकरंद. राजाने त्याच्या गॅरेजचा पत्ता शानीच्या चमच्याला दिला. "आणि आमचेही रायडर आहेतच," मकरंद म्हणाला," हे खालच्या मजल्यावर बसलेले रायडर्स!!" "झालं ना तुमच्या मनासारखं? अजून कुणाला उचलायचं असेल तर सांगा, राजू," भाऊ.. "बास! पंचवीस-तीस पुरेत," राजाने समाधानानं मान डोलावली. "बरं आहे, निघतो आम्ही आता.." मी सटकण्याच्या तयारीत होतो. "आहो, आताच कुठं जाताय? आज लक्ष्मीपूजन आहे.. जरा आमचं लक्ष्मीपूजनही बघून जा..." भाऊसाहेबांचा शब्द म्हणजे हुकूमच होता. तो कसा टाळणार? "मकरंदा, अरे, त्यांना सुंदरनगर दाखव. लेखकांना बघायला आवडतं असं काहीतरी नवीन वातावरण. काय? " भाऊ हसत होते, "रात्रीची पूजा बघा. जेवण करा आणि मग निघा. माझी गाडी जाणारच आहे गावाकडं. तिच्यातनं जा. सकाळपर्यंत पोचाल की."
या भाऊचं अस्खलित, सदाशिवपेठी मराठी ऐकून थक्क झालो. पण काय-काय होते ते पाहायचे , जरासुद्धा विचार करायचा नाही हे पुन्हा मनाला बजावले. सुंदरनगर ही वसाहत किंवा पाल किंवा वस्ती किंवा झोपडपट्टी त्या ऑफिसमागेच होती.आम्ही मकरंदाबरोबर निघालो.
* * * *

एक दिवाळी अशीही येते-६

घरच्यांच्या विरोधाला न जुमानता 'मी लक्ष्मीपूजनाला पुण्याला जाणार' हाच धोशा कायम ठेवला. पाडव्याला परत येण्याचे वचन दिले. माझे जाणे कसे अनिवार्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुठे, "आता तुला काय बांधून घालणार आम्ही? जा कुठे मुलखावर जायचे तिकडे!"अशा शब्दात त्यांची परवानगी मिळाली.
नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान,फटाके, फराळ वगैरे उरकले. खरे म्हणजे दरवर्षी येते तशी मजा आलीच नाही. आता उद्या पुण्याला जायचे, तिथे काय होते कुणास ठाऊक? अशा धाकधुकीने मनात फारसा उत्साह नव्हता. संध्याकाळ झाली तसे एका पिशवीत कपडे भरले. आम्ही रात्रीच्या एस.टी. ने पुण्याला निघणार होतो. "अवसेला प्रवास करू नये. पण आजकाल लोकांना काही धरबंधच राहिला नाही!" असे पुटपुटत आजीने माझी दृष्ट काढली. "नीट सांभाळून जा आणि पोचल्यावर फोन कर."
नऊ वाजताच्या एशियाडने मी आणि राजा पुण्याला निघालो. बस सुरू झाल्याबरोबर प्रवास सुरू करण्याच्या अगोदर त्याच्या प्रघाताप्रमाणे राजाने," गुरुदेव दत्त!" चा घोष केला. इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना मला कधी झोप लागली ते कळलेच नाही. "विश्या, ऊठ. पुणे आलं." राजानं मला हालवून जागं केलं तेव्हा कळलं की बस स्वारगेटात उभी होती.घड्याळात नजर टाकली तर रात्रीचा दीड वाजला होता. बाहेर आलो. तिथं शुकशुकाट होता. रांगेत रिक्षा लावून डोक्याला मफलर गुंडाळलेले दहा-बारा रिक्षावाले पेंगत, नाहीतर सिगरेट फुंकत बसले होते. हवा चांगलीच थंड होती. "मालक, हडपसरला येणार काय?" राजानं पहिल्या रिक्षावाल्याला विचारलं. "हडपसरला कुठं?" रिक्षावाला धूर सोडत म्हणाला. "सुंदरनगर...." मी कुडकुडत होतो. "नाय.. नाय...,तिकडे नाय. मागं विचारा ," रिक्षावाल्यानं माशी उडवावी तसे आम्हाला उडवून लावले. एकेकाला विचारत आम्ही शेवटच्या रिक्षावाल्यापर्यंत पोचलो. त्यानंही नन्नाचा पाढा वाचल्यावर मात्र राजाचं डोकं सटकलं. तो परत पहिल्या रिक्षावाल्याकडे वळला," अय रांडेच्या, तू कवातरी हडपसरला जाशील न्हवं? तुझा नंबर लिहून घेतलाय मी. भाऊंना देतो. घावलास की मग समजंल तुला." रिक्षावाला तंतरला."भाऊ म्हंजे?" "भाऊ म्हंजे आनंदराव धारगुडे!" मला आता अवसान आले होते. "तुमाला भाऊंकडे जायचं हाय का? अवो, मग पहिलेच सांगायचं ना! बसा, साहेब, बसा...बसा!" रिक्षावाला आता फारच अदबीने बोलू लागला. आनंदराव ऊर्फ भाऊ हे काय प्रकरण काय आहे ते आता हळू हळू समजू लागले होते. "अहो, पण भाऊ सुंदरनगरात रहात न्हाईत. मेन रोडवर ऱ्हातात." रिक्षावाला आम्हाला समजावून सांगत होता. "त्यांचं गेस्टहौस तितंच हाये, वरच्या मजल्यावर!" "मग तिकडंच घ्या..." राजानं हुकूम सोडला. "घ्या , घ्या सिगरेट घ्या ," रिक्षावाला आता फारच मऊ झाला होता. राजानं सिगरेट शिलगावली.
स्वारगेट ते धारगुडे गेस्ट हाउस, हडपसर या प्रवासात भाऊ किती थोर आहेत, त्यांचे आपल्यावर किती उपकार आहेत याचे भावपूर्ण वर्णन रिक्षावाला करत होता. "हे आलं बघा, भाऊंचं घर." एका चारमजली आपार्टमेंटवजा इमारतीसमोर रिक्षा थांबवत रिक्षावाला म्हणाला. "किती झाले?" मी. "कसले?", रिक्षावाला. "भाडे!" मी. "काय राव, चेष्टा करताय काय गरीबाची? भाऊंना सांगा, निल्या शेवंत्याच्या रिक्षातून आलो. त्यानं नमस्कार सांगिटलाय. " रिक्षावाला उर्फ निल्या शेवंते अजिजीनं म्हणाला. "बरं..बरं!" राजानं त्याला निरोप दिला.
इमारतीच्या गेटमध्ये पद्धतशीर शिक्युरिटीची माणसं होती. त्यांच्याशी आम्ही कोण? कुठले? कशासाठी आलो? वगैरे बोलल्यावर त्यांनी 'आत' फोन लावला. तिसऱ्या मजल्यावर एक दिवा लागला. त्यांचे बोलणे झाल्यावर एका वॉचमनने आमची तपासणी केली. आमच्या पिशव्या, खिसे, हात, पाय वगैरे चांगले चाचपून पाहिल्यावर तो खोटं-खोटं हसत म्हणाला, "डूटी हाये, करावं लागतं!" मग त्याने आम्हाला लिफ्टमधून तिसऱ्या मजल्यावर नेले. तिथे एक पंचविशीतला, सडपातळ बांध्याचा, घाऱ्या डोळ्यांचा, हसतमुख तरुण उभा होता. "या, या, देशपांडे... तुमचीच वाट पाहत होतो!" तो तरुण सलगीने म्हणाला,"मी मकरंद साठे, भाऊंचा सेक्रेटरी. भाऊ झोपलेत आता. दिवसभर खूप कामात होते. सकाळी लवकर उठायचं आहे ना..." "बरोबर आहे साठेसाहेब." राजानं रुकार दिला. "साठेसाहेब? अहो, नुसतं मकरंद म्हणा मला!" मकरंद हासत म्हणाला. त्याच्या बोलण्यात एक मित्रत्वाची भावना होती. समोरच्या माणसाला चटकन आपलंसं करून घेण्याची कला त्याला साधलेली होती. "या..." त्यानं एका फ्लॅटचं दार उघडलं आणि आतले दिवे लावले,"हे आमचं गेस्ट हाउस... मी शेजारच्या फ्लॅटमध्ये राहतो."
एखाद्या फाइव-स्टार हॉटेलमध्ये शोभावा असा तो 'सुईट' होता. वॉल-टू-वॉल कारपेट, राजेशाही कोच, काचेचे सेंटर टेबल, असंख्य लोलकांचे झुंबर, स्प्लिट एसी, व्हेनेशियन ब्लाईंडस लावलेल्या फ्रेंच विंडोज, एका कोपऱ्यात उंची मद्यांनी भरलेला बार, भिंतीवर ओरिजिनाला ऑइल पेंटिंग्ज, सोनेरी नक्षीकाम केलेलं फॉल्स सीलिंग... आम्ही एका राजमहालात उभे होतो. आमचे पाय जमिनीला टेकलेले नव्हतेच मुळी. ते होते पर्शियन गालिच्यात एक इंच रुतलेले आणि आम्ही उभे होतो जणू मऊमऊ ढगांवर!
हडपसरमधल्या बाहेरून अत्यंत सर्वसाधारण दिसणाऱ्या, न रंगवलेल्या एका इमारतीत असा रंगीबेरंगी स्वर्ग अवतरला असेल असं स्वप्नातही वाटणं शक्य नव्हतं. "बापरे!" माझ्या तोंडून निघून गेलं. "आत बेडरूम्स आहेत. किचन आहे. फ्रीजमध्ये खायचं प्यायचं सगळं आहे. आणखी काहीही लागलं तर बेल मारा. लगेच मिळेल." मकरंद 'काहीही' या शब्दावर जोर देत म्हणाला. "आता काहीच नको. झोपतो आता." राजा म्हणाला. " निवांत झोपा. सकाळी बोलू...गुडनाईट!" मकरंद मिस्किल स्वरात म्हणाला आणि आम्हाला आत सोडून निघून गेला. "राजा, हे भलतंच प्रकरण दिसतंय ," मी "विश्या, झोप आता..."राजानं चर्चा संपवली. बेडरूमच्या राजेशाही बेडवर आम्ही लवंडलो. उबदार दुलईत झोप कधी आली ते कळलेच नाही. ****
सकाळी जाग आली तेव्हा ठरवून टाकलं, आता जे जे होईल ते फक्त पाहत राहायचं. फार डोकं चालवायचं नाही. 'युअर बाथरूम ईज अ रूम टू' या जाहिरातीची आठवण करून देणाऱ्या न्हाणीघरात सकाळची आन्हिकं उरकून दिवाणखान्यात आलो. राजा अगोदरच तयार झाला होता आणि कोचावर बसून पेपर वाचत होता. "गूड मॉर्निंग स्,सर!" कडक इस्त्री केलेला सूट घालून दाराजवळ उभ्या असलेल्या वेटर(?) ने कडक सलाम ठोकला. तो मला उद्देशून सर म्हणाला तेव्हा माझ्या आवाजात उसना भारदस्तपणा आणत मी 'गूड मॉर्निंग' म्हणालो. "ब्रेकफास्टला काय घेणार, सर - ?" त्याने हातातले पदार्थ टेबलावर मांडत विचारले. "मी..." माझे उत्तर घशातच अडकले. कारण टेबलावर जॅम, बटर, ब्रेड, ऑम्लेट, टोस्ट, फळे, ज्यूस, कॉफी यांच्या बरोबरच दोन बियरच्या बाटल्या आणि खारे काजूही होते,"हे काय? सक्काळी, सक्काळी बियर...?" मी थक्क होऊन विचारले. "आमचे बरेच गेस्ट हेच घेतात, सर. म्हणून...." तो अदबीने म्हणाला. "अरे विश्या, तू ते टोस्ट खा आणि कॉफी ढोस. झालं ना?" राजाने मला समजावले, "वोक्के, यू गो" राजाने आपले रुबाबदार इंग्रजी वेटरवर झाडले. तसा आणखी एक सलाम ठोकून तो निघून गेला.
मी कोचावर बसलो तर तो गुबगुबीत कोच चांगला आठ इंच आत दबला. बोस म्युझिक सिस्टिमवर बिस्मिल्लाखानाची सनई सुरू होती. अहाहा, सकाळी आठ-साडे आठची वेळ, थंडगार वातावरण, मनाजोगता ब्रेकफास्ट, गरमागरम-वाफाळती कॉफी, कानात बिस्मिल्लाखांसाहेबांची सनई, समोर तीनचार मराठी-इंग्रजी पेपर्स! आदर्श सकाळ... तिचा मनसोक्त आनंद लुटत असतानाच बेल वाजली. यावेळी दारात मकरंद साठे उभा होता. "गुड मॉर्निंग, विश्वास!, विश्वासच नाव आहे ना तुझं?" मकरंदच्या बोलण्यात तीच सलगीची, आपुलकीची छ्टा होती. मग राजाकडे वळत म्हणाला, "गुड मॉर्निंग, राजे सरकार!" "गुड मॉर्निंग, या, आत या.." मी. "अरे विश्वास, हे आहो, जाहो करू नकोस बाबा.., अरे, मी तुझ्यापेक्षा फारतर दोन-तीन वर्षांनी मोठा असेन. किती? वय किती आहे तुझं?" "बावीस" "आणि माझं सव्वीस!! बघ, अरे आपण मस्तपैकी अरे-जारे म्हणू, काय?" तो हसत म्हणाला. त्याचं व्यक्तिमत्त्व एकदम उमदं, छाप पाडणारं होतं. "बसा.. आपलं.. बस ना... घे, कॉफी घे..." मी त्याचा पाहुणचार त्यालाच परत करत होतो. "अरे, आत्ताच ब्रेकफास्ट झालाय माझा... डोन्ट बॉदर! तू घे ना..." तो बसत म्हणाला, " काय राजूमालक, झोप-बीप झाली ना मस्त?" "झकास," राजा खुशीने म्हणाला. "आणि काय पाहिजे काय खायला-प्यायला?" "आता काय लाजिवताय होय?" राजा त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाला. साठेच्या सलगीची लागण आता राजाला झाली होती. "पण, हे विश्वासराव काय खुलत नाहीत अजून... काय विसुभाऊ?" तो माझ्याकडे पाहत राजाला म्हणाला. "न्हाई, त्यो जरा बावचळल्यागत झालाय..." राजाने बियर बाटलीकडे बोट दाखवत म्हटले.
मकरंद मोठ्याने हसू लागला. "विसू, अरे ते आमच्या नेहमीच्या पाहुण्यांना लागतं. बरीच मोठी मंडळी येतात इथे. अरे, काहीजण तर सकाळीच पहिल्या धारेची मागणी करतात, काय समजलास? म्हणून ब्रेकफास्टला बियर - तंदुरी चिकन देण्याच्या प्रघात आहे इथे. मंत्री, मोठे ऑफिसर्स, दादा - भाई , चित्रपट निर्माते...कधीकधी ही रोजसुद्धा येतात. त्यांच्या एकेक सवयी पाहून अगोदर मीही असाच बावचळून जायचो. पण आता काही वाटत नाही. अरे, तीन-चार वर्षापूर्वी मीपण तुझ्यासारखाच एक मध्यमवर्गातून आलेला इंजिनियर होतो... साधा इंजिनियर नाही, सीओईपीमधून कॉँप्युटर सायन्स केलंय मी..." त्याच्या स्वरात कोरडेपणा होता.
मी 'आ' वासून ऐकत होतो. सीओईपीतून कॉँप्युटर इंजिनियर झालेला एक मध्यमवर्गीय, सुसंस्कृत, उमदा, हसतमुख तरुण एका अंडरवर्ल्ड डॉनचा सेक्रेटरी? काहीच ताळतंत्र लागत नव्हते. "मग तू इथे...!!?" माझ्या तोंडून निघून गेलेच. "विश्या, लेका तुला किती वेळा सांगिटलं? लै चौकशा नको करूस!" राजानं मला झापलं. "असू दे राजाभाऊ, अरे कुणालाही हा प्रश्न पडणारच! इंजिनियर झालेला , सदाशिवपेठेतला एक कोकणस्थ ब्राह्मण मुलगा इथे एका कुप्रसिद्ध गुंडाचा सेक्रेटरी म्हणून कसा?" मकरंद स्पष्टपणे म्हणाला,"हा प्रश्न अजून मलाच पडलाय. पाच वर्षांपूर्वी मला जर कोणी तुझ्या आयुष्यात हे असं होणार आहे म्हणून सांगितलं असतं तर मी त्याला वेड्यात जमा केलं असतं. पण आता वाटतं - आपल्या आयुष्यात पुढं काय वाढून ठेवलंय हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या बापालाही कळणं शक्य नाही.. म्हणजे ब्रह्मदेव असेल तर हां..." तो पुन्हा हसू लागला. मी आणि राजा दोघेही अवाक झालो होतो. "अरे, हे तर काहीच नाही... तुला माहीत नसेल म्हणून सांगतो - मी फक्त भाऊंचा सेक्रेटरी नाही - त्यांचा मेव्हणा आहे मी! माझी बहीण - मयुरी - म्हणजे आताची सुंदराताई - त्याची पहिली बायको आहे. सुंदरनगर - नाव ऐकलंस ना? ते सगळं माझ्या ताईचं आहे. आहेस कुठे?" आता मात्र आम्ही उडालोच. सुंदरनगर - म्हणजे भाऊच्या बायकोच्या नावाची वस्ती- टाळक्यात हळुहळू प्रकाश पडत होता.
एकदम स्वर बदलत तो म्हणाला,"असो. या विषयावर पुन्हा कधी बोलू. तर.. आज दुपारी तीन वाजता भाऊ तुम्हाला भेटतील. दुपारी ते तसे रिकामे आहेत. एक रायटर येणार आहे मुंबईहून - भाऊंच्या नव्या पिक्चरची स्टोरी सांगायला. तेव्हा बसू... तो पर्यंत निवांत फिरून या, जेवण करा. खाली वाहनं आहेत -पाहिजेत तर- मी निघतो आता - आज लक्ष्मीपूजनाची बरीच कामं आहेत.." आम्हाला काही बोलण्याइतके सावरण्याची संधी न देताच तो निघूनही गेला. काही वेळाने मी राजाला म्हणालो," राजा... हे भलतंच प्रकरण दिसतंय..." "विष, तू लै विचार करतोस बाबा. आसंच असतंय. दिसतंय तसं नसतंय म्हणूनच जग फसतंय"राजाने नेहमीप्रमाणे एक डायलॉग मारलाच. मकरंद साठे या व्यक्तीविषयी गहन विचार करण्यात मी बुडून गेलो.
* * * *

एक दिवाळी अशीही येते-५

गावाला मागं टाकून स्कूटर निघाली होती. "इकडं कुठं?" मी विचारलं. "इथं माझा एक दोस्त आहे- कलावंत म्हणून - तेरवडीच्या नदीजवळ त्याची वीटभट्टी आहे. त्याच्याकडं जाऊ या," राजा म्हणाला. तेरवाडी (त्याला बोलीभाषेत तेरवडी म्हणतात) हे शेजारचं खेडं. तिथे तेरगंगा नदीच्या काठावर बऱ्याच वीटभट्ट्या होत्या. ऑक्टोबरातल्या उतरत्या संध्याकाळी सूर्य तेरगंगेत डुंबत होता. बुटक्या, अर्धवट बांधलेल्या पिरॅमिडसारख्या दिसणाऱ्या वीटभट्ट्यांतून हळूहळू धूर निघत होता. आसमंत त्या धुराच्या गंधाने भरून गेला होता. अर्धवट जळलेल्या दगडी कोळशाचा तो वास मला सुखावून जात होता. एका वीटभट्टीजवळ स्कूटर थांबवून राजा उतरला. मी त्याच्या मागोमाग गेलो. "नमस्कार, आण्णा!" राजानं समोर उभ्या असलेल्या एका नेहरू शर्ट, पायजमा आणि गांधी टोपी घातलेल्या अधेड वयाच्या इसमाला हात जोडले आणि मग उभ्या उभ्याच त्याच्याशी बोलू लागला. "नमस्कार! बोला राजूमालक, काय? काय? लै दिसानं आलासा गरीबाकडं, काय इशेष?" आण्णा म्हणाला. "हां, तसंच म्हत्त्वाचं काम निघालं म्हनून आलो तुमच्या दर्शनाला" राजा हसत म्हणाला. "काय ह्ये राजू? आमी-तुमी काय दोन हाय व्हय? तुमी हुकूम करायचा फकस्त!" आण्णा दिलखुलास. "त्याचं असं झालं बघा आण्णा...." अशी सुरुवात करत राजूने अथपासून इतिपर्यंत सगळी हकिगत आण्णाला सांगितली. "हां, आमीबी येनार की शेर्त्या बघाया. मग काय करायचं म्हंता? त्यो कोन श्यान कोठारी का काय? आनुया काय उचलून त्येला?" हा आण्णा म्हणजे काय प्रकार असावा त्याचा थोडाथोडा अंदाज त्याच्या बोलण्याने मला येऊ लागला. श्यामचे श्यान (शेण) करून तो मोकळा झाला होता. "नको, नको.... आण्णा!" राजा गडबडीने म्हणाला,"तसलं काय बोलू बी नका!" मग माझी ओळख करून देत म्हणाला,"आण्णा, ह्यो माझा भाचा... इंजिनेर झाला यंदा." त्याची हिंट आण्णाला कळली,"आसं का? वा! वा! कसलं विंजनेर म्हनाचं? शिविल का?" वीटभट्टीचा संबंध त्या एकाच जातीच्या इंजिनियरशी येत असल्याने त्याचा प्रश्न योग्यच होता. "नाही. इले़ट्रॉनिक्स- म्हणजे हे रेडिओ, टी.व्ही. वगैरे..." मी त्याला म्हणालो. "आसं का? वा!वा! तेलाबी विंजनेर असत्यात का? भले! आमाला वाटलं ते काम टी.व्ही. मेक्यानिक करत्यात." आण्णा. त्याचंही खरंच होतं. मलातर त्या टेक्निशियन इतकंही इलेक्ट्रॉनिक्स् येत नव्हतं. "आणि आण्णा, ह्यो नाटकं, गोष्टीबी लिवतो बरं का!" राजाने माझी स्तुती केली. "आसं का? वा! वा!" आण्णा हसत म्हणाला. हे 'असं का? वा! वा!' म्हणण्याची त्याची एक लकब होती. "बरं... मग राजू? काय कराचं तुमच्या कामाचं?" आण्णा म्हणाला. "तुम्ही मागं म्हणालावता.. तुमचे भावजी अस्त्यात पुन्याला. काय बी काम निगालं पुन्याला तर सांग म्हनून." राजा. "हां, तेच विचार करत होतो." आण्णा टोपी काढून डोके खाजवत म्हणाला. "त्यो करंल खरं! राजु, तुमी असं करा - म्या फोन करतो तेला. तुमी स्वताच जाऊन भेटा तेला. तसं म्याबी सांगीनच. होऊन जाईल तुमचं काम." मग खिशातल्या पाकिटातून एक व्हिजिटिंग कार्ड काढून राजाच्या हातात देत म्हणाला," ह्यो पत्ता..., तेच्यावर फोनबी हाय दिल्याला." राजाने कार्ड पाहून माझ्या हातात दिले. त्याच्यावर "आनंद धारगुडे, बी.ए." हे नाव आणि खाली सुबक, मोठ्या अक्षरात "मयुरी इंटरनॅशनल फिल्म्स प्रा. लि." आणि "सुंदरनगर, हडपसर, पुणे" इतकाच पत्ता आणि एक फोन नंबर होता. ते पाहून मी," पण या पत्त्यात रस्त्याचे, गल्लीचे नाव नाही. मग एवढ्या पत्त्यावर कसे जाता येईल?" असा सुशिक्षित मध्यमवर्गीय प्रश्न विचारला. त्यावर आण्णा खिंकाळून हसला. म्हणाला, "राजू मालक, लै हुश्यार हाय तुमचा भाचा." राज चपापून म्हणाला, "विश्या, तू जरा गप बश्शील काय?"मग आण्णाला म्हणाला, "याला काय माहित नाय त्यातलं. आम्ही जातो लगोलग." "बरं, बरं! जावा. आनंदराव आता आलाय पुन्यात. न्हायतर तुमची पंचाईत झाली असती. जावा लागलीच. दिवाळीनंतर पुन्ना भाईर जानाराय म्हनं," आण्णानं माहिती दिली. "बरं, निगतो मग आन्ना." राजा. "हे काय राजू? इक्त्या दिसांनी आलायसा गरीबाकडं. कायतरी घिऊन जावा..." आण्णा. "आता नको, पुन्ना कधी," राजानं स्कूटर स्टँडवरून काढली. परतीच्या मार्गावर हळूहळू राजानं आण्णा आणि आनंदराव या दोन माणसांची कथा सागितली. आण्णा ऊर्फ लेकोजी कलावंत हा माणूस असंख्य वीटभट्ट्यांचा मालक होता हे खरेच. पण त्याहीपलिकडे त्याचे एक साम्राज्य होते. आमच्या गावातले समस्त हातभट्टी आणि देशी दारूचे अड्डे त्याच्याच मालकीचे होते. वीटभट्ट्यांच्या मागे त्याच्या दारूभट्ट्याही लागत असत. शिवाय आमच्या गावातला तो मटका-किंग होता. पानपट्ट्यांच्या नावाखाली बुकिंग घेणाऱ्या यंत्रणेचा तो प्रमुख होता. "त्याच्या दिसण्यावर जाऊ नकोस, विश्या!" राजा म्हणाला."भलेभले पुढारी त्याच्यासमोर लोटांगण घालताना मी पाहिलं आहे."
आनंद धारगुडे हा तर अख्ख्या पुण्याचा मटका-किंग होता.मुंबई, कल्याण ही कुप्रसिद्ध मटका रॅकेट पुण्यात चालवण्याबरोबरच त्याचा स्वतःचाही पुणे मटका होता. शिवाय देशी दारू - हातभट्टी यात त्याचा हातखंडा होताच. सुंदरनगर ही हडपसर भागातली झोपडपट्टी त्याच्या अक्षरशः मालकीची होती. आनंद धारगुडे ऊर्फ भाऊ याचा पत्ता सुंदरनगर, हडपसर, पुणे इतकासुद्धा गरजेपेक्षा जास्त होता. आण्णाची बहीण आनंदाला दिली होती - पण ते त्याचे दुसरे लग्न होते. त्याची पहिली बायको सुंदरनगरची राणी होती म्हणे. आनंद वर्षातले कित्येक दिवस बाहेर-म्हणजे दुबई, सिंगापूर, हाँगकाँग इत्यादी ठिकाणी असे. त्याचे खालच्या आणि वरच्या जगात मोठमोठे लागेबांधे होते.
त्यामुळे पुण्याचे कसलेही 'काम' त्याच्या डाव्या हाताचा मळ होता. वरच्या जगात त्याची एक चित्रपटनिर्मिती संस्था होती - मयुरी फिल्म्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड. तो अनेक निर्मात्यांना भांडवल पुरवत असे. हा त्याचा उच्चभ्रू व्यवसाय. "म्हणजे अंडरवर्ल्डची मदत घेऊन स्पर्धा घ्यायची काय रे, राजा?" मी घाबरलो होतो. अंडरवर्ल्ड - मारामाऱ्या - खून - एन्काउंटर - बापरे! "विश्या, तू म्हणजे बच्चा आहेस अजून बघ. अरे लेका, तीपण माणसंच आहेत रे. ती काय खातायत व्हय रे आपल्याला?" राजा माझी समजूत घालत म्हणाला. "पण राजा, हे लोक गुन्हेगार असतात. त्यांची मदत घेऊन आपण स्पर्धा घ्यायची? नको, नको!" मी सुशिक्षित मध्यमवर्गीय. "विश्या, त्यांच्या गुन्हेगारीशी आपला काही संबंध येणार नाही. कुणाला काहीही गैर करायला लागणार नाही. मग तर झालं?" राजानं मला पुन्हा समजावलं. "ते कसं काय?" माझी शंका. "अरे, आपण फक्त रायडर मिळवण्यासाठी त्यांची मदत मागायची. त्यांची ओळख असते ना..." राजा. "पण ते उचलून आणणं वगैरे... रायडरच्या मर्जीविरुद्ध?" माझे अजूनही समाधान होत नव्हते. "बरं, जे स्वतःच्या मर्जीने येतील ते तरी चालतील ना?" राजा म्हणाला. "पण..." मी. "विश्या, शेवटचा उपाय म्हणून हे करायचं. नाहीतर स्पर्धा रद्द हुईल. तू बघ रे, आता जादा बडबड नको!"राजा त्रासिकपणे म्हणाला. अर्थातच मी मग फक्त जेजे होईल तेते पाहायचे ठरवले- उगी राहून. * * *
* * * दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मंडळी जमल्यावर राजानं त्याचा बेत सर्वांच्या कानावर घातला. काहीजणांनी कुरकूर केली. पण माझ्यासारखेच नंतर गप्प झाले. राजानं आनंद धारगुडेला फोन लावला. हा माणूस काय म्हणतोय त्यावरच आमच्या स्पर्धेचं भवितव्य ठरणार होतं. "हॅलो, धारगुडेसाहेब आहेत काय? मी राजू देशपांडे बोलतोय," राजा. "नाही.. ते बिझी आहेत. मी त्यांचा मॅनेजर बोलतोय - मकरंद साठे. बोला, काय काम होतं, भाऊंकडे?" साठे. मग राजाने आपण कोण, भाऊंकडे आपलं काम काय आहे ते सविस्तर सांगितलं आणि आण्णा कलावंत यांची ओळख दिली. "हो, हो.. आला होता त्यांचा फोन. मीच भाऊंना दिला होता. भाऊ दिवाळीपर्यंत बिझी आहेत. आणि लक्ष्मीपूजनानंतर लगेच बाहेर जाणार आहेत. तुम्ही असं करा - लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच या त्यांना भेटायला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांना मध्येमध्ये वेळ आहे. त्यावेळी बोलता येईल." साठे. "बराय."राजा म्हणाला आणि त्यानं फोन ठेवला.
धारगुडे या माणसाला मकरंद साठे नावाचा मॅनेजर वगैरे असतो यावर माझा विश्वासच बसला नाही. ऐन दिवाळीत तेही लक्ष्मीपूजनाला (घरात राहून पूजा करायचं सोडून) पुण्याला भाऊ धारगुडेला भेटायला जायचं या गोष्टीला कुणाचाच रुकार नव्हता. निव्या, बालमुकुंद, संज्या, विज्या, विकशा या साऱ्याच मंडळींनी “बग बाबा राजा, आता तूच कायतरी कर!" असं म्हणत हळूच काढता पाय घेतला. मग मी आणि राजा अशी दोनच 'कारभारी' मंडळी ग्यारेजात उरलो. "मग विश्या, येनार ना पुण्याला?" राजानं मला यक्षप्रश्न केला. ऐन दिवाळीत पुण्याला जाण्याच्या माझ्या निर्णयाने चिडलेले घरच्यांचे चेहरे माझ्या डोळ्यासमोर तरळून गेले. पण न जाऊन सांगतो कुणाला. स्पर्धेच्या भवितव्याचा प्रश्न होता. "ठरलं, राजा. लक्ष्मीपूजन पुण्यात!" मी उसन्या अवसानानं म्हणालो. मग राजाने परत पुण्याला फोन लावून साठ्याला आम्ही दोघे लक्ष्मीपूजनाला पहाटे येणार असल्याचे कळवून टाकले.
****

एक दिवाळी अशीही येते-४

परत आलो आणि लक्षात आले की आम्ही पाच नोव्हेंबर नक्की केली खरी, पण मध्यांतरीच्या काळात म्हणजे सत्तावीस ऑक्टोबरला दिवाळी येत होती. दिवाळीच्या आधीच सगळी कामे संपवण्याची गरज होती. कामांची एकच झुंबड उडाली - आमचा क्लब तयार करायचा होता, त्याची 'घटना' लिहायची होती, क्लब रजिस्टर करायचा होता, 'एफेम्सीआय' ला क्लबची नोंदणी करायची होती, लेटरहेड-पावतीपुस्तकं छापायची होती, मग शिवाजी मैदानाची परवानगी मिळवायची होती , 'पारा' ला रीतसर स्पर्धा आयोजित करण्याबद्दल विनंतिपत्र पाठवायचे होते, ट्रॅक तयार करायचा होता, रायडर्सना निमंत्रणे पाठवायची होती - आम्हाला काय काय करावं लागणार याची जंत्री गोगटे साहेबांकडून मिळाली होती. सप्टेंबरचा शेवटचा आठवडा सुरू होता आणि नोव्हेंबर पाचला स्पर्धा. मध्येच आलेली दिवाळी. म्हणजे वेळ अगदी थोडा होता. आमची धावपळ सुरू झाली. राजाने कोणी काय करायचे त्याची वाटणी करून दिली. त्याप्रमाणे मंडळी आपापल्या कामाला लागली. शिवाजी मैदान परवानगीचे काम दस्तूरखुद्द राजाकडे होते; तर गावातल्या एका सुप्रतिष्ठित, तरुण रक्ताच्या पुढाऱ्याला - हे एका साखरसम्राट आमदार व राज्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि भावी राजकीय वारसदार वगैरे होते - क्लबच्या अध्यक्षपदी विराजमान करण्याची जबाबदारी विजय आणि संजय बारकुटे यांच्या खांद्यावर पडली. गावात फिरून 'पावत्या फाडणे'- अर्थात देणग्या गोळा करणे हे काम राजाची मित्रमंडळी आणि गॅरेजमालक यांच्यावर सोपवण्यात आली होती.
बालमुकुंद मिस्त्री हा जुना-जाणता मिस्त्री. तो आमच्या गावच्या 'धी गॅरेज ओवनर्स असोशिएशन्न्' चा शेक्रेटरी होता. त्यामुळे स्वाभाविकच समस्त 'धी.... ' ची मेंबर म्हणजे गावातले सगळे गॅरेजवाले मिस्त्री आपापल्या गिऱ्हाईकाकडून ही सक्तीची 'पट्टी' गोळा करणार होते. शिवाय 'बांदवलकर बंधू यांचे किराणा भुसार जनरल स्टोअर्स - आमचे येथे सर्व वस्तू योग्य दरात मिळतील. पत्ता - गांधी पुतळा' किंवा 'अप्सरा क्लॉथ स्टोअर्स - महिलांची फ्रॉकपासून नऊवारी साडीपर्यंत सर्व वस्त्रे मिळण्याचे एकमेव ठिकाण. पत्ता - शिवेचा मारुती' असल्या जाहिराती मिळवून त्यांची कापडी बॅनर्स रंगवण्याचे काम आमच्या संजय कणकवलीकर, निशिकांत मुकाण्णावर, हेमंत सावंत आदी 'नाटकी' मंडळींकडे लागले होते.
गोगट्यांनी एफ् आय एम या संघटनेची 'मोटरस्पोर्टस क्लबाची मार्गदर्शक तत्त्वे' अशा नावाची इंग्रजीतली पुस्तिका आम्हाला सप्रेम भेट दिली होती. ही पुस्तिका तब्बल पाचशे रुपये (त्यावेळी २८ रु. गुणिले १७ डॉलर) किमतीची असल्याने ती चांगलीच महागडी भेट होती. त्या पुस्तिकेत क्लबची उद्दिष्टे, क्लबचे स्वरूप, क्लबची आदर्श घटना इ. मूलभूत तत्त्वे दिली होती. ती वाचून तिचा अर्थ समजून तिच्याप्रमाणे क्लबची घटना तयार करण्याचे (माझ्या दृष्टीने) सर्वात महत्त्वाचे आणि अत्यंत अवघड काम अर्थातच माझ्याकडे चालत आलेले होते. शिवाय 'फर्ड्या' इंग्रजीत सर्व पत्रव्यवहार करणेही माझ्याच अखत्यारीत येत होते.
दिवस भराभर निघून जात होते. आम्ही आता फक्त सकाळी आठ आणि रात्री आठ वाजता राजाच्या गॅरेजवर मीटिंग घेऊन चर्चा करत होतो. बाकी वेळ कामात कसा जात होता ते कळत नव्हते. सर्वजण स्पर्धेच्या नशेत झिंगून गेले होते. आमच्या बरोबर गावालाही झिंग चढत होती. गाड्या उडवण्याची स्पर्धा आता फक्त गाड्या घसरवण्याची स्पर्धा उरली असली तरी आणि ती आता कोडोलीच्या माळावर न होता शिवाजी मैदानात होणार असली तरी त्याने गावाच्या उत्साहात फारसा फरक नव्हता. सुरुवाती-सुरुवातीला “हॅ, गाड्या उडवणार न्हाइ व्हय? मग काय कसली मजा येनार?"असे उद्गार कढणारेही कोडोलीकर सरकारही आता, "या खेपेला र्हाऊं दे! पुढच्या येळंला मातुर माळावरच घेनार बरं का, हां... लेकाच्यांनो, गाड्या घसरून पडल्यावरसुदिक लई मजा येतिया म्हनं!" असे लोकांना सांगू लागले होते.
लोक गावातून गरागरा फिरणाऱ्या आमच्या मोटरसायकलच्या टोळक्यांकडे आनंद, कुतुहल आणि उत्साह अशा संमिश्र भावनांनी पाहत होते. निव्याने त्याच्या मोटरसायकलचे सायलेन्सर, मडगार्ड, हेडलँप असे 'अनावश्यक' भाग काढून टाकल्याने तो त्या नागड्या आणि मोठमोठ्याने कोकलणाऱ्या मोटरसायकलवरून गावातून निघाला की स्पर्धेची आपोआप आणि फुकट जाहिरात होत होती. हळूहळू ते लोण गावातल्या इतर तरुण तुर्क मंडळींपर्यंत पसरल्याने गावाच्या वेगेवेगळ्या भागात मैदानाऐवजी गल्लीबोळ डर्टट्रॅक स्पर्धा सुरू झाल्या. प्रत्येक गल्लीत च्यांपियन तयार होत होते. गाड्या म्वाडिफाय करण्यासाठी गावातल्या गॅरेजवर गाड्या येत होत्या. त्यामुळे बऱ्याच स्पेशालिष्ट मिस्त्रींचा धंदाही जोरात होता. "पुन्या-म्हमईस्नं रायडरं येनार हायती!"- रायडरं!!! "पुन्यास्नं दोन टिमा येनार हायेत" "नाशकास्नं पन येनार हायेत म्हनं" "आरं, नाश्काचं काय घिऊन बसलायसा, मर्दान्यानो! पार केरळातनं येनार हायेत." "आरं तिच्यायला. खरंच काय?" "मग म्या काय खोटं बोलतुया व्हय? म्हादेवाच्या पिंडीला हात लावून सांगतु म्या" "पुन्याचा श्याम कोठारीबी येनार हाय म्हनं!" "हॅ, त्यो कसला येतुया. त्यो गाड्या उडिवतो निस्ता. मातीच्या शेर्तीत नाय खेळत त्यो!" "आरं, मला निव्यानं सागिटलंय त्यो येनार म्हून" "त्यो काय येत न्हाइ बघ" "येनारच!" "येत न्हाई, लागली बीट?" - बीट म्हणजे बेट - पैज. "मर्दान्या, अरं त्या गाड्यांची टायरं येक फूट रुंद असत्यात!" "आरं, त्ये काईच न्हाई. एका शेकंदात शंभर स्पीड घेत्यात म्हनं..." "आरं, आठ गियरं असल्यावर काय झालंय स्पीड न घेयाला." "आन काचकन बिरेक दाबला की गपाककन् थांबत्यात. येक इंच बी हालत नायती." "म्या पर्त्येक्ष पायलंय न्हवं. कितीबी तिरकी केली तरी गाडी पडतच न्हाई ती." - प्रत्यक्ष म्हणजे पोस्टरमध्ये. "हां लेका. येका फोटूत तर चालवनाऱ्या गड्याचं डोस्कं जिमनीला टेकलंवतं. तरीबी गाडी पळत होती - हां" अशा चर्चा दिवसा चौका-चौकात, पानपट्ट्यांवर, हाटिलात च्या-भजीबरोबर आणि रात्री सामाजिक पेयांच्या संगतीने गावात रंगत होत्या. प्रत्यक्षात स्पर्धेत कोण स्पर्धक भाग घेणार, कोणत्या गाड्या येणार हे आम्हालाच माहीत नव्हते. त्यामुळे कोणी त्याबद्दल विचारलेच तर," बरेचजण येणार आहेत. पुणे, मुंबई, नाशिक - सगळीकडून. अजून नाव नोंदणी सुरू झालेली नाही, त्यामुळे नक्की नावे सांगता येणार नाहीत." असे गुळमुळीत उत्तर ठोकून देण्याची आतल्या गोटातील सर्वांनाच राजाची ताकीद होती.
गोगट्यांनी 'पाराचे काही रायडर पाठवीन' असे आश्वासन दिल्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. दिवस भराभर निघून चालले होते. शिवाजी मैदानासाठी नगरपालिकेची परवानगी मिळाली होती. आमचा 'आस' क्लब स्थापन झाला होता. राज्यमंत्र्यांच्या भावी वारसदारांनी त्याचे अध्यक्षपद स्वीकारले होते. विज्या बारकुटे उपाध्यक्ष झाला होता, राजा कार्याध्यक्ष झाला होता, मला उप-कार्याध्यक्ष असे बिरुद प्राप्त झाले होते, बालमुकुंद खजिनदार झाला होता. बाकीची मंडळी कार्यकारिणी सभासद झाली होती. त्यांच्या समाधानासाठी त्यांनाही प्रसिद्धी विभाग प्रमुख, स्पर्धा व्यवस्थापन प्रमुख अशा उपाध्या दिलेल्या होत्या. या क्लबची मूळ इंग्रजी घटना आणि तिचा मराठी तर्जुमा मी तयार केल्याने मला उगीचच डॉ. आंबेडकर झाल्यासारखे वाटत होते. एफेमेस्सीआयला त्या घटनेची प्रत पाठवून आणि त्यांची रोख रुपये १०,००० सदस्य वर्गणी भरून (प्रायोजक - स्व. इंदिरा गांधी सहकारी साखर कारखाना, बलवडी खुर्द) क्लबला त्यांची मान्यताही मिळाली होती. पाराला रीतसर पत्र पाठवून त्यांना स्पर्धा घेण्याची लेखी विनंती केली होती. त्यांनी ती मान्य करून शिक्कामोर्तब केले होते. पुणे, मुंबई, नाशिक इथल्या स्पर्धकांना पत्रेही पाठवून झाली होती. पन्नासेक हजार रुपये वर्गणीतून आणि जाहिरातीतून गोळा झाले होते. आता फक्त स्पर्धकांच्या अधिकृत प्रवेशपत्रिकांची वाट पाहत होतो. बघताबघता दिवाळी समोर येऊन ठेपली. गावातल्या आणि पंचक्रोशीतल्या पंधरा-वीस फुरफुरणाऱ्या खोंडांनी स्पर्धेत प्रवेश घेतला होता. पण ते सारे हौशी (ऍमच्युअर) गटात मोडत होते. व्यावसायिक (प्रोफेशनल) एंट्री अजून एकही आलेली नव्हती. गावातला प्रत्येक जण मात्र मुंबई-पुण्याच्या स्पर्धकांना आणि त्यांच्या गाड्यांना पाहण्यासाठी आतुर झाला होता. ते स्पर्धक जर आले नाहीत तर लोक आमच्या तोंडाला काळे फासतील अशी रास्त भीती प्रत्येक क्लब मेंबराला वाटू लागली. कारण वर्गणीच्या पावत्या फाडणारे बालमुकुंद, त्याचे गॅरेजवाले मित्र आणि जाहिराती गोळा करणारे आमचे नाटकातले मित्र यांनी श्याम कोठारीच मोटोक्रॉस-डर्टट्रॅकमधल्या करामतींच्या सुरम्य आणि चमत्कारिक, पण काल्पनिक कथा पैसे गोळा करताना अगदी तिखट-मीठ लावून लोकांना ऐकवल्या होत्या. इथे कुणा लेकाने असली स्पर्धा प्रत्यक्षात पाहिली होती? कारण स्पर्धेत कोण भाग घेणार हे कळल्याशिवाय पैसे द्यायला लोक तयार नव्हते. मग नेहमीप्रमाणे मार्केटिंगचे लोक जसे ग्राहकांना चंद्रावर नेतात तसे आमच्या 'द्रव्य समुच्चयक' मंडळाने मनाला येईल ते (राजाने सक्त ताकीद देऊनही) ठोकून दिले होते आणि ते आता आमच्या अंगलट येण्याची लक्षणे दिसू लागली होती. ***
एके दिवशी सकाळी बैठक भरल्यावर या विषयावर गंभीर चर्चा झाली. गंभीर म्हणजे गरमागरम. बालमुकुंद, निव्या इत्यादी मंडळी तापली होती. "आम्ही पैकं गोळा केलं. आता रायडरं आली न्हाईत तर आपलं काय खरं न्हाई. आपन तर लोकान्ला त्यांचं पैकं परत द्येनार. आतापावतर ज्यो काय खर्च झाला आसंल त्यो राजानं सोत्ताच्या खिश्यातनं दिला पाय्जेल!" असं त्यांचं म्हणणं होतं. तर उत्म्या आणि विकशा," राजानं काय येकट्यानं ठरवली नाय रेस. सगळ्यांनी जबाबदारी घ्यायला पाय्जेल." असं म्हणत होते. वातावरण चांगलंच गरम झालं. "अरं असं कशाला? गोगट्यांना फोन लावूया. बघू या तेंचं काय म्हणणं हाय ते." राजा म्हणाला. गोगट्यांना फोन लावला. ते म्हणाले," देशपांडे , मी आजच तुम्हाला फोन करणार होतो. सॉरी, सांगायला वाईट वाटतंय पण इथे 'पारा'चे स्पर्धक कुणी इतके लांब यायला तयार होत नाहीयेत. गाड्या नेणं अवघड आहे असं म्हणतात." राजाला ब्रह्मांड आठवलं. तरीही धीर गोळा करून तो म्हणाला," पण तुम्ही तर म्हणाला होता की येतील म्हणून?" "खरं आहे. पण काय आहे, इथे मुंबईच्या एका क्लबानं सात नोव्हेंबरला स्पर्धा ठेवली आहे. तुमची स्पर्धा करून लगेच परत मुंबईला जाणं शक्य नाही. शिवाय तिकडे येण्याजाण्याचा खर्च देणार आहेत. बक्षीसही बरंच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ती जुनी स्पर्धा असल्याने तिचे चँपियनशिप पॉईंटही जास्त आहेत. त्यामुळे सगळेच रायडर तिकडे जाण्यासाठी धडपडत आहेत." "मग नाशिकमधले?" राजाची आशा . "त्यांची पण तशीच कंडिशन आहे," गोगटे. "मग आता?" राजा हताशपणे म्हणाला. "तुम्ही काळजी करू नका. स्पर्धा घेण्यासाठी मी स्वतः ऑफिशियल म्हणून येतो. यावर्षी तुमच्या गावच्या स्पर्धकांची हौशी गटाची स्पर्धा ठेवू. मी तुम्हाला स्पर्धा कशी आयोजित करायची त्याचं ट्रेनिंग देतो. या अनुभवामुळे तुम्ही पुढच्या वर्षी छान स्पर्धा ठेवू शकाल; आणि त्यावेळी आपण डेट्स क्लॅश होणार नाहीत याची काळजी घेऊ." गोगटे सहानुभूतीने म्हणाले.
कृष्ण येतो म्हणतो, पण त्याचे सैन्य बरोबर नाही. पण त्याचा काय उपयोग? हे काही महाभारत नव्हते! श्याम कोठारीच्या कथा ऐकलेल्या गावकऱ्यांना गावठी च्यांपियन कसे चालणार? पण त्यात गोगट्यांचाही काहीच दोष नव्हता. आम्हीच गावात फुशारक्या मारून ठेवल्या होत्या. आपलेच दात आणि आपलेच ओठ. आता मात्र सगळ्यांची हवा टाईट झाली. उरलासुरला आधार गेल्यामुळे आता 'आलिया भोगासी असावे सादर' या उक्तीप्रमाणे वागावे लागणार याची खात्री पटली. "राजा, कोणकोण रायडर येणार याची खात्री केल्याशिवाय तू स्पर्धा कशाला ठेवलीस?"इति परचुरे "आता आपुन काय करायचं?" विक्शा "तरी आम्ही सांगत होतो, असली स्पर्धा ठेवायची म्हणजे फार अवघड काम आहे," विज्या. "झालं येवढं मोप झालं, आता स्पर्धा रद्द करून लोकांचं पैकं दिवून टाकू परत्," निव्या. "आनि आप्ल्या अद्धेक्षाला काय सांगनार?" बालमुकुंद. "तेला काय सांगायचं? तेला काय फरक पडतुय? तेनं काय केलया म्हनून तेला सांगाया जायचं?" उत्म्या. "आसं कसं? त्यो पडला अद्धेक्ष. डुक धरला म्हजी उद्याला गावात राहवू देयाचा न्हाई!" विष्ण्या. "तर...तर... बरा राहवू देयाचा न्हाई? गाव काय तेच्या 'बा'ला आंदण दिलाय काय कुणी?" विक्शा. "अरे हो, हो... जरा ऐका. इतकं काय तिरिमिरीला यायचं करणं न्हाई. अजून कायतरी करता येतं का ते बघू." राजाचा दुर्दम्य आशावाद पाहून मी थक्क झालो. आता या परिस्थितीतही 'कायतरी' करणं मलातरी अशक्यच वाटत होतं. "हे बघा, तुम्ही गप घरी जावा आता. मी करतो काय तरी," राजानं बैठकीचं सूप वाजवलं. मी मात्र मागे रेंगाळलो. "आता रे राजा? हे भलतंच झालं. आपण चांगली स्पर्धा भरवली इतकी. सगळी तयारी पण झाली जवळजवळ. आता रायडर नाहीत म्हणजे कसली स्पर्धा आणि कसलं काय?" मी त्याला म्हणालो. "विश्या, काही काळजी नको. जास्तीत जास्त काय हुईल? मला वीस-पंचवीस हजार रुपये पदरचे घालावे लागतील. इतकंच ना? अरे, असे कितीतरी पैसे आले आणि गेले... काय? मला काय करायचेत पैसे साठवून? माझ्यामागं कोण आहे?" राजा कोरडेपणानं म्हणाला. "असं कसं? पंचवीस हजार काही लहानसान रक्कम नाही. तुझं हातावरचं पोट. पुढंमागं साठवलेलेच पैसे कामाला येणार!" मी त्याला समजावत म्हणालो. "आपला भरोसा देवावर. हिंमत-ए-मर्दा तो मदद-ए-खुदा..." राजा एकदम तत्त्वज्ञान सांगू लागला. "अरे, पण पुढची तरतूद...?" मी. "बसा, ह्यो विषय संपला." राजानं पडदा टाकला. "बरं, ते जाऊ दे. तू काय करायचं म्हणतोस पुढं?" "चल, बस मागं." राजानं स्कूटरला किक मारत म्हटलं आणि आता हा काय करतो? या उत्सुकतेनं मी त्याच्यामागं टांग टाकली.

एक दिवाळी अशीही येते-३

त्याबरोबर राजा त्या नेपाळी बहाद्दराला ढकलून आत घुसला. "नमस्कार." दोन्ही हात जोडून समोरच्या व्यक्तीला नमस्कार करत राजा म्हणाला. चेहर्‍यावर एक ओळखीचे हास्य. (त्यात त्याचे सिगारेटने पिवळे पडलेले दात दिसलेच पाहिजेत.) राजाची ही खास पद्धत. फक्त "काय वळख लागतीय का?" हा नेहमीचा पुढचा प्रश्न मुळात आधीची ओळख नसल्याने त्याने विचारला नाही. "मी राजू देशपांडे ." त्याच्या मागोमाग आम्ही सारे आत घुसलोच होतो. "नमस्कार, नमस्कार, या - तुमचीच वाट पाहत होतो." समोर उन्हाने रापलेल्या तांबूस गोर्‍या रंगाचा, डोक्यावरचे केस थोडेफार विरळ झालेला, मजबूत बांध्याचा, हसतमुख, पस्तिशीच्या आत बाहेरचा माणूस उभा होता. डोळ्यात हिरवट घारेपणाची छटा होती. डाव्या डोळ्यापासून वर उजव्या बाजूला डोक्याकडे तिरका गेलेला एक खोल व्रण कपाळभर पसरला होता - एखाद्या वीर योद्ध्याच्या अंगावर शोभणार्‍या जखमेच्या खुणेप्रमाणे. कुठल्याशा रेसमधला अपघात असावा बहुधा. "मी श्रीकांत. या, आत या." गोगट्यांनी व्हरांड्याकडे हात केला.
गोगट्यांचा बंगला फारच सुंदर होता. कुंपणावर भरगच्च झाडी, समोर बाग, हिरवीगार लॉन, एक छोटेसे कारंजे, व्हिक्टोरियन पद्धतीच्या उंच खिडक्या, व्हरांडा, प्रशस्त दिवाणखान्यात एक झोपाळा, भिंतीवर लटकणारी सुंदर पेंटिंग्ज, वरच्या मजल्यावर जाणारा पांढरा शुभ्र जिना. त्या सगळ्यात एक खानदानी साधेपणा होता. काहीही दाखवण्यासाठी मांडले आहे असे वाटत नव्हते. एखाद्या इंग्रजी चित्रपटात शोभेलसे घर आम्ही सर्वजण प्रत्यक्षात पाहत होतो. काय बोलावे कुणालाच सुचत नव्हते. " बसा." गोगटे म्हणाले. "वा! झकास आहे हो तुमचं घर!" माझ्या तोंडून चुकून निघून गेले. पण गोगट्यांना आवडले असावे. "हे आमच्या आजोबांनी विकत घेतले एका साहेबाकडून. आम्ही तसेच जपतोय." मग राजाला म्हणाले, "बोला देशपांडे! मग मोटोक्रॉस ठेवायची म्हणता?" "जुळणी करतोय, साहेब. आता बघू कसं कसं जमतंय..." राजा. " जमेल की, त्यात काय आहे ? आम्हीपण असेच चुकतमाकत शिकलो हळूहळू. आम्ही करू तुम्हाला मदत. तुम्ही फक्त काम करायची तयारी ठेवा." गोगटे. "कामाला काय हयगय व्हायची न्हाई. तसं आमी मान्साला कमी पडनार न्हाई. किती मान्सं लागतेली?" निव्या. "माणसं तर पाहिजेतच. बरीच. पण त्यांना शिकवायला लागेल बरंच." मग गोगट्यांनी मोटोक्रॉस म्हणजे काय प्रकार असतो, ते सविस्तर सांगायला सुरुवात केली.
आम्ही तोवर मोटोक्रॉस फक्त फोटोंमध्ये बघितली होती. संजय बारकुटे हौशी (ऍमॅच्युअर) गटात एकदाच पुण्याच्या स्पर्धेत खेळला होता. पण स्पर्धेत भाग घेणे वेगळे आणि स्वतः स्पर्धा आयोजित करणे वेगळे. या स्पर्धेची आमची कल्पना म्हणजे चुन्याची फक्की मारून एक वाकडातिकडा रस्ता तयार करायचा, तो रस्ता निरनिराळ्या खड्ड्यांतून, ढिगार्‍यांवरून, पाण्यातून न्यायचा. स्पर्धेची जाहिरात करायची - दोन-तीन पेपरात जाहिराती, गावात फलक ’जंगी / भव्य मोटोक्रॉस स्पर्धा. दिनांक -, वेळ- वाजता, स्थळ -कोडोलीचा माळ , प्रमुख पाहुणे- अमुकतमुक, उदघाटक - अलाणेफलाणे. सर्व नागरिकांनी या स्पर्धेस उपस्थित राहून आनंद घ्यावा. इच्छुक स्पर्धकांनी देशपांडे गॅरेज येथे नाव नोंदणी करावी’. मग स्पर्धक नावे नोंदवतील. लोक स्पर्धा बघायला येतील. स्पर्धक गाड्या 'उडवतील'. लोक टोप्या-फेटे उडवतील, शिट्ट्या मारतील, टाळ्या वाजवतील. पहिल्या पाच नंबरांना बक्षिसं दिली की खलास. झाली मोटोक्रॉस स्पर्धा..!
गोगटे सांगत होते - साहसी मोटरसायकल स्पर्धांचे वेगवेगळे प्रकार आहेत. मोटोक्रॉस, सुपरक्रॉस आणि डर्टट्रॅक हे प्रकार आपल्याकडे खेळले जातात. स्पर्धा घेण्याचा अधिकार फक्त अधिकृत मान्यताप्राप्त मोटरस्पोर्ट संघटनांनाच असतो. त्यासाठी एफआयएम (फेडेरेशन इन्तरनॅशनले दे मोतोसायक्लिज्मे) अशा फ्रेंच नावाच्या आंतरराष्ट्रीय (ऑलिंपिक संघटनेकडून मान्यताप्राप्त) संघटनेचे सदस्य बनावे लागते. भारतात या स्पर्धांसाठी एफएमएससीआय (फेडरेशन ऑफ मोटरस्पोर्टस् क्लब्स ऑफ इंडिया) या मध्यवर्ती संस्थेकडून मान्यता असावी लागते. अशी मान्यता मिळाल्यावर ही संघटना स्पर्धेसाठी निरीक्षक नेमते. प्रत्येक स्पर्धेसाठी नियमावली आहे. ही नियमावली अत्यंत बारकाईने बनवलेली आहे. स्पर्धेच्या प्रत्येक बाबीचा सांगोपांग विचार करून हे नियम बनवलेले आहेत. स्पर्धेचा कोणताही नियम जर पूर्ण झाला नाही, तर निरीक्षक अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा ती स्पर्धाच रद्द करू शकतो.
ऐकताना लक्षात येऊ लागले की मोटोक्रॉस स्पर्धा घेणे म्हणजे काही खाण्याचे काम नव्हते. टेबलटॉप जंप, कॅमलबॅक जंप, ट्रिपल जंप, वॉटरहोल्स, बर्म, रँप या सर्वांनी परिपूर्ण असलेला नागमोडी, डाव्या-उजव्या काटकोनी वळणांचा ट्रॅक बनवणे; प्रेक्षक आणि स्पर्धक यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे; (त्यासाठी जुन्या निकामी टायर्सच्या भिंती उभ्या करणे); ठिकठिकाणी पिवळ्या रंगाचे पोषाख घातलेले पिवळे झेंडे हातात घेतलेले फ्लॅगर उभे करणे; काळ्या-पांढर्‍या चौकटी असलेला, लाल, पिवळा, काळा - या झेंड्यांचे अर्थ; ऑफिशियल, रेफरी, स्टिवर्ड ह्या पदावरच्या व्यक्तींच्या जबाबदार्‍या... गोगटे सांगतच होते. या महत्त्वाच्या गोष्टींबरोबरच स्पर्धेसाठी नावाजलेले आणि निष्णात स्पर्धक (रायडर्स) मिळवणे, त्यांच्या गाड्यांसह येण्या-जाण्याची, राहण्याची सोय करणे, गाड्यांची तांत्रिक तपासणी करणे, स्पर्धेला विविध शासकीय परवानग्या आणि या खेळातील (मोटरस्पोर्टेस) अधिकृत संघटनांची मान्यता मिळवणे या बाबी किरकोळ नव्हत्याच. पुण्यात-नाशकात ज्या स्पर्धा होत, त्या पुण्यातल्या पारा (पुणे ऑटोमोटिव्ह रेसिंग असोसिएशन) आणि नाशकातल्या नासा (नासिक ऑटोमोटिव्ह स्पोर्टिंग असोसिऍशन) संघटनेकडून घेतल्या जात. `पारा` या संघटनेला श्रीकांत गोगटेसारख्या मोटरस्पोर्ट मधल्या अत्यंत अनुभवी आणि मुरब्बी माणसाचे नेतृत्व होते. त्यांच्या संघटनेने अनेक वर्षे या खेळासाठी कष्ट केल्यावर पुण्यात या स्पर्धा नियमाने भरू शकत होत्या. शिवाय त्यासाठी भरपूर खर्च होत होता - एकेका स्पर्धेसाठी किमान चार-पाच लाख रुपये...पुण्यातल्या स्पर्धांना व्हीडॉल-कॅस्ट्रॉल अशा जागतिक ऑईल कंपन्यांनी प्रायोजित केल्यामुळेच हा खर्च परवडत असे. हे सगळे त्यांनी सविस्तर सांगितले, तेव्हा उपस्थित मंडळीच्या डोळ्यांसमोर काजवे चमकू लागले. आमचे मोटोक्रॉसचे स्वप्न त्या कॅस्ट्रॉल कॅलेंडरपुरतेच राहणार काय अशी शंका सर्वांनाच वाटू लागली. तेवढ्यात आतल्या खोलीत टेलिफोन वाजला आणि गोगटे फोन घेण्यासाठी गेले. आम्ही आपापसात कुजबुजू लागलो - "अगदी कमीत कमी म्हटलं तरी ४ ते ५ लाख रुपये खर्च येईल!! " राजा चिंताक्रांत. "मागं नाटकाला आपण पाच हजार जमवले तेव्हा किती त्रास झाला!" मी. "आणि इतके पैसे गोळा करायचे तर दोनेक वर्षे तरी लागतील." विजय बारकुटे. "आपनच उतरलो तर स्पर्धेत? तेवढा रायडरचा खर्च वाचंल." निव्याची सूचना. "आपणच स्पर्धा भरवायची आणि आपणच भाग घ्यायचा? हॅ, हे काय बरोबर नाही!" संजय बारकुटे. "आता सप्टेंबर चालू हाय. पुढल्या वर्साला १५ आगस्टपावतर तरी हुईल का ह्ये ?" उत्म्या. "..." असेच बरेच काही.
आम्ही सगळेच हौशी. कुणाच्या खिशात शंभर रुपये निघाले तरी फार झाले. नोकरी ना धंदा. त्यातल्या त्यात गॅरेजवाली मंडळी ४-५ हजारांपर्यंत पदरमोड करू शकणारी. तीही जिकिरीने. बारकुटे धंदेवाईक. त्याला तर नेहमी पैसा कमी पडे. सगळी सोंगं आणता येतात, पण पैशाचं नाही - हेच खरं. "बघू या की कसं होत नाही. मी करतो कायतरी," राजा उद्गारला खरा, पण त्यालाही हे ओझे कसे आवरणार, असा प्रश्न होताच. "काय पण झालं तरी या वर्षीच ही स्पर्धा घ्यायची, ही काळ्या दगडावरची रेघ. नाही झाली तर कुणाच्यापण ढांगेखालून जाईन मी" - राजा इरेला पेटला होता. "ते पैशाचं मागनं बघू या. अगोदर त्या एफेमसीआय च्या परवानगीचं बघू की." राजानं एफएमएससीआयचं एफेमसीआय केलं होतं.
आत गोगट्यांना आमची 'कुजबूज' ऐकू गेली असावी. "खर्चाबद्दल म्हणत असाल तर चार-पाच लाख रुपये तरी खर्च येतोच." ते फोन ठेवून बाहेर येत म्हणाले. "स्पॉन्सरशिपसाठी मी कॅस्ट्रॉलसारख्या एखाद्या कंपनीला गळ घालीन." आमचा जीव भांड्यात पडणार इतक्यात ते पुढे म्हणाले, "...पण एका नव्या क्लबच्या नव्या स्पर्धेला ते इतके पैसे देतील, याची खात्री नाही. शिवाय तुमचा क्लब अजून 'एफएमएससीआय' कडे रजिस्टर नसल्याने स्पर्धेची परवानगी मिळणं अवघड दिसतंय." बाप रे! पैशांचं खटले अजून मिटले नाही आणि आता हे परवानगीचे घोडे अडले, म्हणजे संपलेच! इकडे आड आणि तिकडे विहीर. हा गोगटेबाबा आपल्याला मदत करतोय की स्पर्धा तुम्ही घेऊ शकत नाही, हे आडवळणानं सुचवतोय? असं मला वाटू लागले. पुण्याच्या माणसांचं काही खरं नाही. पण त्यांच्या पुढच्याच वाक्याने या शंका पळवून लावल्या. "...पण काही हरकत नाही. स्पर्धा घेऊच आपण. मी तुम्हाला एक मार्ग सुचवतो. बघा पटला तर!" "तुम्ही जसं म्हणाल तसं!" विज्या बारकुटे अधीर झाला होता. "हे बघा, आता तुमचा एक क्लब स्थापन झालाय, असं समजा. ते क्लबची घटना वगैरे सावकाशीनं बघू. तर खर्च कमी करण्याच्या दृष्टीनं तुमच्या क्लबतर्फे पहिल्या वर्षी मोटोक्रॉस ऐवजी डर्टट्रॅक स्पर्धा ठेवू. या स्पर्धेत जंप नसतात. त्यामुळे ट्रॅकला होणारा खर्च कमी होईल." "पण जंप नसल्या तर लोकान्ला मजा कशी येनार?" विक्शा. "विक्शा, ऐक रे!" राजा समजुतीच्या स्वरात. गोगटे पुढे म्हणाले, "नाही, नाही... डर्टट्रॅकमध्येही जंप नसल्या तरी बेंड, पाणी, चिखल असतंच. अरे, प्रेक्षकांना मजा येत नसती तर इतक्या डर्टट्रॅक स्पर्धा झाल्या असत्या काय जगात? शिवाय डर्टट्रॅकचे नियमही थोडे शिथिल आहेत मोटोपेक्षा. तिथे फ्लॅगरना फार ट्रेनिंगही लागणार नाही. त्याचे बरेच ऑफिशियल पण उपलब्ध आहेत. रायदारही कमी पैसे घेतील." "आणि पुढल्या वर्षी घिऊ की मोटोक्रॉस!" राजाला आता डर्टट्रॅक पचनी पडू लागली होती. "तेच तर म्हणतोय मी!" गोगटे त्याचा उत्साह वाढवत म्हणाले," आणि परवानगीचं म्हणाल तर पारानं एफएमएससीआयकडून वर्षभराची लायसन्स घेऊन ठेवली आहेत, स्पर्धा भरवण्यासाठी. त्यातलं एखादं डर्टट्रॅकचं लायसन्स बदलून घेऊ तुमच्या रेसांसाठी.. काय ?" ही लायसन्स वर्षभराच्या स्पर्धांसाठी अगोदरच दिलेली असतात हे त्यांनी सांगितलेच नव्हते. "मी मुद्दामच बोललो नाही आधी. वर्षभरात भारतात होणार्‍या सर्व मोटरस्पोर्ट स्पर्धांचं वेळापत्रक अगोदरच तयार असतं. तशी लायसन्स त्या - त्या क्लबांना - संघटनांना अगोदरच इश्यू होतात. आम्ही 'पारा'कडून पाच-सहा स्पर्धांची लायसन्स घेऊन ठेवतो. मग त्याप्रमाणे वर्षभर स्पर्धा भरवतो. "गोगटे बोलत होते. "आता अगोदर तुम्हाला मी हे सांगितलं नाही, कारण तो प्रश्न येणार नाही हे माहीत होतं. आमचं एक डर्टट्रॅकचं लायसन्स आहे -नोव्हेंबरचं. ती स्पर्धा आम्ही पुण्यात घेणार होतो. आता तुमच्या गावाला घेऊ. काय?" "पण असं कसं करता येईल ? मग स्पर्धा तुमच्या 'पारा'च्या नावानं होणार!" मी वकिली मुद्दा काढला. माझ्याकडे मिस्किल नजरेने पाहत गोगटे म्हणाले "म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हटलं - बघा पटलं तर. नाहीतर असं करू या का? समजा तुमच्या क्लबचं नाव.... हां.. असोसिएशन ऑफ ऑटोमोटिव्ह स्पोर्ट्स - आस - तर 'आस' आणि 'पारा' यांच्या संयुक्त विद्यमाने वगैरे भव्य डर्टट्रॅक स्पर्धांचे आयोजन करता येईल," त्यांनी आमच्या अजून अस्तित्वातच नसलेल्या क्लबचे नामकरणही करून टाकले होते. नावही चांगले वाटत होते - आस म्हणजे (मोटरसायकलच्या) चाकाचा कणा आणि आस म्हणजे (स्पर्धेची / खेळाची / बक्षिसाची) ओढ" या दोन्ही अर्थांनी. "खरंच की. गोगटे साहेब, मानलं तुम्हाला - एका झटक्यात आमचा प्राब्लेम मिटला." राजा आनंदात असताना नेहमी विंग्रजी शब्द वापरतो. "म्हंजे हे ठरलं म्हंतायसा?" निव्या आश्चर्याने म्हणाला. "अजून काही बाबी आहेत. शिवाय डर्टट्रॅकलाही थोडाफार खर्च येणारच. त्याची तयारी कशी करायची ते पाहावं लागेल. पण मी स्पॉन्सर्सशी बोलेन." इति गोगटे. "पण गरज पडल्यास एक लाख रुपयांची तरतूद करावी लागेल. शिवाय स्पर्धेसाठी एक सपाट मैदानही मिळवावं लागेल." "ते सोडा हो. आमच्या गावचं शिवाजी मैदान आहे की झकास. नगरपालिका स्टेडियम बांधतीय. एका झटक्यात पालिकेची परवानगी मिळवतो की न्हाई बघा की," हे राजाचं खास क्षेत्र होतं. "मग ठरलं तर.. पाच नोव्हेंबर.. शिवाजी मैदान.. डर्टट्रॅक..." गोगटे म्हणाले.. "आस आणि पाराच्या संयुक्त विद्यमाने -" मी उठता उठता हसत म्हणालो. "अरे, उठलात कशाला? काही तरी घ्या गोडाचं!" गोगटे म्हणाले आणि आत हाक दिली, "रामभाऊ, चहा-फराळाचं बघा पाहुणेमंडळींचं! बरं, चला, तोपर्यंत आपण माझ्या गाड्या बघू." बंगल्याच्या मागे असलेल्या गॅरेजमध्ये अनेक मोटरसायकल होत्या - आम्ही फक्त पोस्टरमध्ये पाहिलेल्या - इंपोर्टेड निंजा, कावासाकी १२५ मोटो (होली काव), होंडा २५० पासून अगदी राजदूत - जावा पर्यंत - स्टॉक आणि मॉडीफाईड. गोगटे म्हणाले,"मी आता मोटरसायकल खेळत नाही. पण गाड्या ठेवल्यात. आठवणी आहेत एकेक गाड्यांच्या. कार रॅलीत मात्र भाग घेतो." मग राजा, निव्या, संज्या आणि विज्या वेड्यासारखे गाड्यांभोवती फिरत राहिले. गोगटेही त्यांच्या प्रश्नांच्या भडीमाराला उत्तरे देत होते. या गाडीचा फोर्क असा का? सीसी किती? हा सायलेन्सर मॉडिफाय केला तर काय होईल? या गाडीचा गियर रेशो कसा बदलला? या चेनचे स्प्रॉकेट मोठे बसवले तर काय होईल ? असे बरेच प्रश्न. त्यांची वेव्हलेंग्थ जुळली होती. ***

एक दिवाळी अशीही येते-२

राजाचे गॅरेज म्हणजे त्याच्या घरासमोरच्या अंगणात टाकलेले पत्र्याचे छप्पर होते. एका भिंतीवर त्याच्या औजारांचा एक फलक होता. त्यावर वेगवेगळ्या नंबरांचे पट्टीपाने, रिंगपाने, बॉक्सपाने, ऍलन कीज, पक्कडी, राघू पक्कडी, स्क्रू ड्रायव्हर लटकवण्यासाठी जागा होत्या. पण त्यातली निम्म्याच्या वर हत्यारे कामगारांमध्ये फिरत असल्याने तो फलक रिकामाच दिसे. २० बाय १५ च्या जागेत आणि गॅरेजसमोर, रस्त्यावरच्या झाडाखाली दुरुस्तीला आलेल्या स्कूटर, मोटरसायकली आणि मोपेड गाड्या, काढलेली आणि उघडलेली इंजिने, क्लच प्लेटा, ब्रेकशू, गंजक्या रिम, सायलेन्सर, शॉकऑप (शॉक ऍब्सॉर्बर्स), जुने स्पेअर्स, पॅकिंग सील्स आणि शेल्लॅकच्या बाटल्या, ऑइलच्या बुधल्या आणि जुने ऑइल काढलेल्या बुट्ट्या, ग्रीसचे डबे, चेन, व्ही बेल्ट्स, स्प्रॉकेट, पुल्या, गियर्स, पिस्टन, पिस्टन रिंगा, कारब्युरेटर, कनेक्टिंग रॉड, स्क्रू, नट, वायसर (वॉशर्स), बोल्ट, क्लच आणि ब्रेक केबल्स यांची एकच गर्दी उसळलेली असे. (बघा, मला गॅरेजमध्ये बसूनबसून किती माहिती मिळाली.) या गर्दीतच गॅरेजमधले २ अनुभवी, ४ शिकाऊ आणि २ बारके कामगार वळवळत असत. राजा फक्त खास गिर्‍हाइकांच्या गाड्या, मॉडिफिकेशन आणि 'दमवणाऱ्या' गाड्यांनाच हात लावत असे. बारक्या हा प्रकार पाने, स्क्रू ड्रायव्हर आणून देण्यापासून ते 'चा' सांगणे, बिडी-काडी आणणे या कामांसाठी राखीव होता. वर्षानुवर्षे तेल सांडून आणि ग्रीसचे हात पुसून भिती, खांब आणि फरशी यांच्यावर एक काळा, बुळबुळीत राप चढलेला होता. त्यामुळे ते एक गॅरेज आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नव्हती. तरीही "हेच ते तासगावकर बंधू यांचे... तासगावकर मटन शॉप" च्या धर्तीवर “हेच ते राजू देशपांडे यांचे... राजू देशपांडे गॅरेज" असा बोर्ड लटकत होता. त्याखाली प्रोप्रा.राजू देशपांडे !! शिवाय, 'इंधनाच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग' असेही एक वाक्य लिहिले होते. त्याबद्दल विचारले असता "विश्या, अरे साधा अर्थ आहे! तुम्ही इथे दुरुस्तीला गाडी टाकली की तिच्या टाकीतल्या इंधनाच्या प्रत्येक थेंबाचा वापर झाल्यावरच गाडी परत मिळेल!" असे राजाने मिस्किलपणे सांगितले होते.
तर काय सांगत होतो? स्पर्धेचे कळल्यावर अनेक मंडळी राजाच्या गॅरेजवर चकरा टाकू लागली. इनॅमलवेष्टित तांब्याच्या तारा गुंडाळण्याचे रिकामे झालेले रीळ हे गॅरेजमध्ये काम करणाऱ्या माणसाचे बसण्याचे स्टूल असते हे सर्वांना माहीतच आहे. अशी सापडतील ती अनेक धडकी-मोडकी, काळपट रीळस्टुले - सापडतील त्या रिकाम्या जागांवर ठेवून मंडळी स्थानापन्न होत. मग ब्रिस्टॉल शिलगावून, डोळे बारीक करून, गहन विचारात गुंगत आपापली मते मांडत.
मग नेहमीप्रमाणेच या सर्व लोकांतला 'विंग्रजी' भाषा उत्तम (!) वाचणारा आणि लिवणारा (दीड)शहाणा माणूस म्हणून माझा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मला जाणवू लागले. त्यामुळे सर्व चर्चा आणि बैठकांमध्ये माझी उपस्थिती अत्यंत अनिवार्य असून, माझ्या मताला मोठीच किंमत असल्याचे मला कळून चुकले.
नेहमीप्रमाणे गावात (अर्थातच) अशाच प्रकारची स्पर्धा घेण्याची इच्छा असलेला आणखी एक गट होताच. राजा मोटोक्रॉस घेणार हे गावभर झाल्यावर या गटाकडून 'अशी स्पर्धा घेण्याची कल्पना मूळ आमचीच आहे, त्यामुळे आम्हीच ती घेणार, असा प्रचार सुरू झाला. आता या गटाशी 'चर्चा' करणे भाग होते. मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे असे बखेडे सोडवण्यात राजाचा हातखंडा असल्याने अर्थातच त्या मंडळींनी लवकरच आपला सवतासुभा सोडून राजाच्या स्पर्धेत सक्रिय मदत करण्याचे मान्य केले. मग तीही मंडळी राजाच्या गॅरेजवर चकरा मारू लागली.
या चर्चांमध्ये एका एक्स्पर्ट निरीक्षकाची भूमिका घेऊन मी सहभागी होत असे आणि फक्त महत्त्वाच्या जागीच माझी मौलिक टिप्पणी करत असे. अर्थात त्यामुळे मी नेहमीच गॅरेजमधील महत्त्वाच्या जागी, म्हणजे एकमेव लोखंडी खुर्चीवर स्थानापन्न होत असे हे वेगळे सांगणे नकोच.
तर अशा बैठका सुरू झाल्यावर आमच्या (म्हणजे माझ्या! आणि खरे म्हणजे सर्वांच्याच) लक्षात आले की प्रतिस्पर्धी गटातील मंडळींचे म्हणणे खरेच होते. त्यांनी या स्पर्धेविषयी नुसता विचार केला नव्हता, तर त्याबद्दल अभ्यासही केला होता आणि मग त्याला केवढे मोठे भगीरथ प्रयत्न लागतील, याचा अंदाज आल्याने त्यांनी तो विचार सोडून दिला होता.
महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यातला कोणीही राजा नव्हता. "... की रे!"ची भीष्मप्रतिज्ञा केल्यावर त्यापासून ढळेल तो राजा कसला? (म्हणूनच कदाचित भीष्माचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजेसाहेबांनी तिशी ओलांडल्यावरही लग्न करण्याचे टाळले होते.) "आता तुम्ही म्हणताय ते खरं. हे करायचं अवघड. पण पुण्यात घेतातच का नाही?" राजाचा प्रश्न होता. "राजा, अरे पण ते पुणं आहे आणि तिथं कायपण होऊ शकतं...", संज्या बारकुटे म्हणाला. संजय आणि विजय बारकुटे हे दोघे बंधू उच्चशिक्षित - इंजिनियर - वगैरे. संजय बारकुटेने एकदा कधीतरी पुण्याच्या मोटोक्रॉस स्पर्धेत भाग घेतला होता. (तो स्पर्धा पूर्ण करू शकला नाही हा भाग वेगळा.) यामुळे त्यांच्याकडे या भूतपूर्व-विरोधी गटाचे नेतृत्व आपोआपच चालत आलेले होते. "मग आपलं गाव काय कमी आहेय का?" राजाचा गावाबद्दलचा अभिमान उफाळून आला. "राजा, पण ते म्हणतात त्यात तथ्य आहे." मी माझा निर्णय दिला,"मोटोक्रॉस स्पर्धा कशी घेतात ते आपल्याला मुळीच माहीत नाही." "त्याला काय-काय लागतं ते घेतलं की झालं की!" राजाला स्पर्धेच्या यशाबद्दल प्रचंड आत्मविश्वास होता. हे 'काय काय' म्हणजे सरकार दरबारी परवानग्या, अधिकृत मान्यता वगैरे. सरकारी परवानग्या मिळवणे या कामात राजा एकदम वाकबगार होता. पंचक्रोशीतल्या कोणत्याही सरकारी कार्यालयातल्या शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाशी राजाची ओळख असे. म्हणजे नसली तरी तो ती काढू शकत असे. मिळवलेला संदर्भ त्या व्यक्तीसाठी इतका खासंखास असे की राजाने घातलेली गळ ती व्यक्ती नाकारू शकत नसे. बऱ्याच वेळेला तर राजाने खुद्द त्या व्यक्तीलाच काही वैयक्तिक बाबीत मदत केलेली असे. राजा वैयक्तिक स्वार्थासाठी कधीच काही करत नाही हेही सर्वज्ञात होते. या त्याच्या अनेक मैत्रीसंबंधांमुळे राजाला सर्वजण मदत करत. तर अशा रितीने जे-जे लागते ते सर्व होणारच याची खातरजमा होती. मग मंडळी स्पर्धा कुठे ठेवावी या विषयाकडे वळली. "कोडोलीच्या माळावर ठेवू. एकदम तयार आहे ट्रॅक. जादा काही करायची गरज नाही." विजा बारकुटे म्हणाला. त्याचा भाऊ संजा बारकुटे हौशी मोटोक्रॉस खेळाडू होता. तो गावाबाहेरच्या एका उजाड माळावर प्रॅक्टिस करत असे. त्या माळाजवळच कोडोली हे गाव असल्याने त्याला `कोडोलीचा माळ` म्हणत. या माळावर निसर्गतया निर्माण झालेले काही उंचवटे आणि खड्डे होते. त्यामुळे तो माळ गाड्या उडवण्याच्या स्पर्धेसाठी उत्तम असे त्याचे म्हणणे होते. "असं काय ? चला बघू या." म्हणत आमची फौज माळाकडे निघाली. वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकास आणि पर्यायाने साऱ्या गावाला आम्ही 'स्पर्धेची जागा पाहण्यास जात आहोत' हे जाहीर झाले. त्यामुळे गावातले बरेच जण आमच्या संगतीने आपापल्या दुचाक्या घेऊन कोडोलीच्या माळाच्या दिशेने निघाले.
माळावर बरेच मातीचे ढिगारे, खड्डे होते. नुकताच पाऊस पडून गेल्याने चिखलही होता. काही खड्ड्यात पाणी साचलेले होते. काही ठिकाणी गवत माजले होते. असा मोटोक्रॉसचा नैसर्गिक ट्रॅक त्रैलोक्यात मिळणार नाही, याची आम्हाला खात्रीच झाली. बघता बघता चांगले पंचवीस-तीस गडी माळावर गाड्या उडवून ट्रॅकची चाचणी करू लागले. त्यात एकादोघांची हाडे ढिली झाली, एका गाडीच्या पुढच्या चाकाची रिम वाकडी झाली. त्यामुळे हा ट्रॅक भलताच चॅलेंजिंग होणार, अशी प्रत्येकाची खात्री झाली. "कुणाचा रं हा माळ?" विकशा पाटलानं पाईंटाचा मुद्दा काढला. कारण त्या माळावर स्पर्धा ठेवायची, तर माळ उजाडच असला तरी त्याच्या मालकाची परवानगी लागणार हे स्पष्ट होते. "कोडोलीकर सरकारांचा." हे कोडोलीकर सरकार म्हणजे कोडोली गावचे पूर्वाश्रमीचे वतनदार आणि लोकशाहीत कोडोली बुद्रुक ग्रामपंचायतीचे आजन्म सरपंच होते. तसे बऱ्यापैकी खाष्ट म्हणून त्यांचा लौकिक होता. "त्यांचं माझ्याकडे लागलं," बालमुकुंद मिस्त्री म्हणाला. सरकार रिवाजाप्रमाणे बुलेट मोटरसायकलच वापरत. ती मोटरसायकल सरकारांना आपल्या मिशीइतकीच प्रिय. बुलेट एका किकमध्ये स्टार्ट झालीच पाहिजे, तिचा आवाज दोन मैलांवरून ऐकू आलाच पाहिजे, तिचा हेडलाईट 'सर्चलाईट झक मारंल' असा झगझगीत असलाच पाहिजे, असल्या बऱ्याच 'च' बाबी बालमुकुंदा 'बुलेट स्पेशालिष्ट्' म्हणून सांभाळत होता. त्याकारणाने आठवड्यातून सरकारांची एखादी फेरी बालमुकुंदाच्या गॅरेजवर होत असे. मुकुंदानेही त्या बुलेटला एकदम झ्याकपाक ठेवले होते. त्यामुळे मुकुंदावर सरकारांची खास मर्जी होती. ते मुकुंदाचा शब्द मोडणार नाहीत, ही खात्री असल्याने "स्पर्धेचे स्थळ : कोडोलीचा माळ" ही स्पर्धेच्या जाहिरातीवरची अक्षरे आम्हाला स्पष्ट दिसू लागली.
हळूहळू स्पर्धेचे वारे गावाच्या कानात शिरू लागले होते. आमच्या दैनंदिन बैठका जोमाने सुरू होत्या. मध्यंतरी बालमुकुंदाने कोडोलीकर सरकारांच्या बुलेटला असे टायमिंग सेट केले की ती अर्ध्या किकमध्येच स्टार्ट् होऊ लागली आणि तिचा आवाज तीन मैलांवरून 'सपष्ट' ऐकू येऊ लागला. त्यामुळे "शेर्त्या लावताय व्हय माळावर? अरं, मंग लावा की! इच्यारताय काय त्यात, मर्दांनो?" अशा शब्दात सरकारांची परवानगी आम्हाला मिळाली. त्यांच्या दृष्टीने मोटोक्रॉस म्हणजे नव्या युगातल्या बैलगाड्यांच्या शर्यतीच होत्या. (एका दृष्टीने खरंच आहे ते!) अर्थात साऱ्या गावालाही ते स्थळ थोड्याच दिवसात जाहिरात न करताच कळले ही गोष्ट अलाहिदा. कारण "आमच्या माळावर मोटारसायकल शेर्त्या हायती, बगायला यायचं बरं का" असं मिशीवर ताव देऊन सांगत दस्तूरखुद्द सरकारच गावभर फिरू लागले.
ही परवानगी मिळाल्यावर आमच्या उत्साहाला खूपच उधाण आले. आम्ही कोडोलीच्या माळावर एका दिवसात कधीही आणि कितीही फेऱ्या मारू लागलो. माळाचा सर्व्हे करून ट्रॅक कसा करता येईल त्याची मनातल्या मनात आखणी करू लागलो. बोराच्या झाडापाशी मांडव घालायचा, तिथनं स्टार्ट - मग सरळ जाऊन मारुतीच्या दगडापाशी काटकोनातलं वळण, मग परत सरळ जाऊन पुढच्या टेंगळावर पहिली उडी - थेट पुढच्या डबक्यात- वगैरे. माळावरच्या झाड, झुडूप, दगड, ढिगारा, खड्डा, डबके या सर्वांना सांकेतिक नावे देऊन बऱ्याच उहापोहानंतर ट्रॅकचे तीन कच्चे आराखडे निर्माण करण्यात मला यश आले. त्यांचे सर्व मंडळींनी कौतुक केल्यावर माझ्या अंगावर मूठभर मांस चढले. *** पण प्रत्यक्षात स्पर्धा कशी घेतात त्याबद्दल काहीच माहीत नसल्याने एखाद्या अनुभवी व्यक्तीस विचारणे भाग होते. "संज्या, तू पुण्याला पाराच्या स्पर्धेत खेळलास न्हवं? तुला म्हाइत असंल की लेका!" इति सुद्या माळी. संज्या जणू आपण जागतिक मोटॉक्रॉस स्पर्धांचे बाप आहोत अशा आविर्भावात वावरत असे. सुद्या माळ्याला त्याची हवा पंचर करायची होती. "नाही म्हणजे... तशी मला थोडीफार माहिती आहे, पण म्हणजे..."संज्या चाचपडला. "संजू, ते राहू दे. तुला पाराचा पत्ता आणि टेलिफोन नंबर तरी माहीत असेल," परचुरे. "हां. तो आहे." संज्याला धीर आला.
तो फोन नंबर घेऊन आम्ही मग श्रीकांत गोगट्यांचा पत्ता आणि फोन नंबर मिळवला. त्यांची भेट घेण्यासाठी त्यांना फोन केला. तो गृहस्थही पुणेकर असूनही इतका भला निघावा? त्यांनी चटकन "स्पर्धा ठेवताय ? कधीही या. फक्त येण्याच्या आदल्या दिवशी मला फोन करा म्हणजे झाले. माझ्याकडून जितकी होईल तेवढी मदत मी करीन." असे सांगितले. आम्ही कोण? कुठले? याची चौकशीही न करता त्यांनी हे निमंत्रण दिलेले ऐकून आमच्या आनंदाला पारावारच राहिला नाही.
पुण्याला जायचं, तिथं फिरायचं म्हणजे स्वतःच्या वाहनानेच गेलेले बरे असा सर्वांचाच विचार पडला. उत्तम पाटलाची म्हणजे त्याच्या वडलांची एक डिझेल ऍम्बॅसेडर होती. ते बाहेर जात तेव्हा स्वतःसाठी वापरत. इतर वेळेला ती गावातल्या गाडीतळावर भाड्यासाठी लावलेली असे. "मी आम्ब्याशिटर दीन. पण डिझेलचा खर्च मात्र काण्ट्रीबुशननं." उत्म्याने प्रस्ताव मांडला. वाहनाचा खर्च वाचल्यामुळे तो एकमताने मंजूरही झाला. उत्म्या आणि विकशा ही जोडी आळीपाळीने ड्रायव्हरचे काम करणार होती. त्यामुळे ड्रायव्हर पगार, त्याचा भत्ता वगैरे वाचणार होते. सहा जणांचे खाणे पिणे (हे महत्त्वाचे) आणि डिझेलचा खर्च याला सहाने भागून येणारी रक्कम एक हजाराच्या आसपास जात होती. निव्या, उत्म्या, विकशा, राजा, विज्या, संज्या अशी मंडळी पैसे घालून जायला एका पायावर तयार झाली. माझ्या खिशात दिडक्या नसल्याने मी तोंड उचकटले नाही, पण या सहा जणांमध्ये माझ्यासारखी महत्त्वाची व्यक्ती असणे गरजेचे होते असे मी आडवळणाने राजाला सुचवले. तेव्हा सहा जण जात आहेत, तर आणखी एका (हडकुळ्या आणि फुकट्या) माणसाने फारसा फरक पडणार नाही असा विचार त्याने केला असावा. "विश्या, तू पण चल की रे!" तो म्हणाला. राजाचा शब्द मोडणे कुणालाच शक्य नव्हते. "आता तू म्हणतोयस तर येतो मी." मी म्हणालो.
पुण्याला जायचे मुक्रर होताच आम्ही गोगट्यांना फोन केला. "उद्या येताय ? बरं, मग अकरा वाजता मी वाट बघतो तुमची." त्यांच्या घराच्या खाणाखुणा समजावून घेतल्या. कर्वे रोडवर कुठेतरी त्यांचे घर होते. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे चार वाजताच आम्ही निघालो. पुण्याला जायला खासगी वाहनानेही पाचेक तास लागलेच असते. शिवाय चहापाणी, नाश्ता, घर शोधणे, हे सारे. मजल-दरमजल करत आम्ही पुण्याला पोचलो. ऍम्बॅसेडर जुनीच होती, पण तेलपाणी केल्याने इंजिन ठीक होते. त्यामुळे प्रवास निर्विघ्न पार पडला. डेक्कनजवळ पत्त्याची चौकशी केली आणि पाचेक मिनिटात आम्ही गोगट्यांच्या घरासमोर होतो. गाडीतून उतरलो. गोगट्यांचे घर म्हणजे एक व्हिक्टोरियन थाटाचा दुमजली बंगला होता.
पुरुषभर उंचीचे हिरव्या रंगाचे फाटक बंद होते. तिथेच बाजूला एक बेलचे बटण होते. ते दाबले तसे फाटकात असलेल्या एका दरवाज्यातून एक गुरखा बाहेर डोकावला, "क्या काम है?" "गोगटे साब को मिलने का है, " मी माझी हिंदी पाजळली. "शाब अभी बाहर गया है, "गुरखे नेहमी एकेरीतच का बोलतात, हे न सुटलेले कोडे आहे. "पर उन्होने तो हमे अकरा बजे बुलाया था मिलनेकू", राजा. "लेकिन हम बोलता है, शाब अबी नही है." गुरखे स्वतःला मात्र हम म्हणतात. "लेकिन तुम देखो तो - साब हुंगे अंदर." विकशा. "हम फोन करकू आये है. वैसेच नय." "ऐसा सब लोग बोल्ता है. बाद में शाब हमको गुश्शा करता है." आता याला कसे समजवावे, असा विचार करत असतानाच, "बहादूर, कौन है ?" अशी हाक आली.

एक दिवाळी अशीही येते-१

त्या दिवसात मी बरेच काही सामाजिक कार्य करत असे. या 'सामाजिक कार्या'ला माझ्या घरातले आणि शेजारपाजारचे लोक धंदे करणे, लष्करच्या भाकऱ्या भाजणे असेही म्हणत. त्या दिवसात, म्हणजे कॉलेज संपून नोकरी मिळण्याच्या मधल्या काळात. त्या काळी आजच्यासारखे कँपस इंटरव्ह्यू अजून सुरू झाले नव्हते. एवढेच कशाला? शिक्षण पूर्ण झाल्यावर दोन-दोन वर्षे नोकरी मिळवण्यासाठी भटकत राहावे लागत असे. परवापरवाची गोष्ट आहे... असे म्हणता म्हणता आता त्यालाही तब्बल सोळा वर्षे लोटली.
तर काय सांगत होतो ? मी इंजिनियरिंग कसेबसे संपवून कॉलेजबाहेर पडलो. काहीही करण्याचा जबरदस्त कंटाळा आला होता. एक-दोन महिने निवांत घरीच काढले. लायब्ररीची पुस्तके वाचत, मित्रांबरोबर भटकत, कधी कधी नुसतेच लोळत. मग त्याचाही कंटाळा आला म्हणून नोकरी शोधू लागलो. त्या काळी नोकऱ्या फारशा नव्हत्याच. त्यातही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरला तर पुण्याशिवाय कुठेच नोकरी मिळत नसे. आणि या पुण्यातल्या कंपन्याही नवीन, लघु उद्योग स्वरूपाच्या. या कंपन्यांतल्या नोकऱ्या म्हणजे फार तर दोन-तीन हजार रुपये पगाराच्या. त्यामुळे नोकरी मिळाली, तरी महिन्याचा खर्च चालवण्यासाठी घरून पैसे मागवावे लागत, अशी परिस्थिती होती. ज्यांना मोठ्या कंपनीत नोकरी मिळे ते नशीबवान. त्यांना पाच हजारांच्या वर पगार मिळे आणि त्यात त्यांचा महिन्याचा खर्च निघत असे. अशा परिस्थितीत नोकरी मिळणे म्हणजे काही समाधानाची बाब नव्हती. काहीच न करण्यापेक्षा हे बरे म्हणून मी नोकरी शोधू लागलो खरा, पण जाहिराती बघता त्यातल्या बऱ्याचशा 'फिरता विक्रेता' याच स्वरूपाच्या होत्या, हे लक्षात आले. मग माझे नोकरीतले स्वारस्य संपले.
त्यापूर्वीची गोष्ट, म्हणजे कॉलेजमध्ये असताना मी कविता, कथा आणि एकांकिका लिहीत असे. त्यात बऱ्यापैकी गतीही होती. त्यामुळे एकांकिका लिहिणे, त्या बसवणे, लोकांना गोळा करणे, 'सांस्कृतिक' इत्यादी कार्यक्रमांची निर्मिती करणे; अशा अनेक भानगडी मी त्या काळी लीलया करत असे. हे आठवले की आता माझे मलाच आश्चर्य वाटते. कॉलेज संपल्यावरही हा किडा वळवळत होताच. तेव्हा आता नोकरी तर मिळत नाही, मग असाच काहीतरी 'कार्यक्रम' करण्याची कल्पना माझ्या डोक्यात आली.
माझा चुलतमामा राजा देशपांडे, याचे एक स्वयंचलित दुचाकीदुरुस्तीचे दुकान म्हणजे साध्या भाषेत गॅरेज होते. (आजही आहे.) राजा नात्याने माझा मामा असला तरी तो मामापेक्षा माझा मित्रच जास्त होता. कामधंदा नसल्याने मी त्याच्या गॅरेजमध्ये जाऊन तासनतास बसत असे. त्याची सगळी गिऱ्हाइके त्याचे मित्रच बनलेली होती. साऱ्या गावाची खबरबात घेऊन लोक राजाच्या गॅरेजमध्ये येत आणि मग चहा-सिगरेटच्या संगतीत दिवस कसा निघून जाई, तेच कळत नसे. राजा तसा हिकमती. त्यामुळे लोकांच्या समस्त समस्या सोडवण्याची, त्यांना सल्ले देण्याची जबाबदारी आपोआपच त्याच्याकडे चालत येई. तंट्यात मध्यस्थी करणे हा तर त्याचा आवडता उद्योग. गावातली अनेक भांडणे राजाने साम, दाम, दंड, भेद, नीती या साऱ्या मार्गांचा अवलंब करून सोडवली होती. आमचा राजा म्हणजे अप्पूराजा या कमला हासनच्या चित्रपटातला राजा. आणि विशेष म्हणजे असल्या अनेक भानगडी करताना कधी राजाच्याच खिशाला चाट बसे, तर कधी हाता-पायाला झालेल्या दुखापती घेऊन इस्पितळात दाखल व्हावे लागे. पण तरीही तो दादा किंवा भाई नव्हता. तो फक्त राजाच होता.
राजा म्हणजे एक अवलिया इसम. ब्राह्मणाच्या जातीत जन्मला म्हणून ब्राह्मण. याच्या खांद्यावर जानवे होते. जातीमुळे मांसाहार, मत्स्याहार तो करत नसे. तसेच तो श्रावणात केशकर्तन व मद्यपान करत नसे. या गोष्टी सोडल्या तर तो ब्राह्मण होता, हे कानीकपाळी ओरडूनही कुणाला पटले नसते. सहा फुटांवर एखादा इंच उंची, छळकाटा बांधा, काळाशार वर्ण, बारीक कापलेले कुरळसर केस, खुरटी दाढी, सिगारेट ओढून पांढरट डाग पडलेले काळे ओठ आणि तांबारलेले डोळे (दारूमुळे नव्हे - ते नेहमीच तसे असत). तो त्याच्या खर्जातल्या आवाजात " एय् रांडेच्या!" इतकंच म्हणाला की समोरच्याचा धीर सुटत असे. त्याच्या तारुण्यात तो तारुण्यातल्या नाना पाटेकरसारखा दिसत असे. गॅरेजमध्ये काम करून करून घट्टे पडलेल्या त्याच्या मोठ्या, दगडी हातांची थप्पड खाल्लेला माणूस दोन दिवस तरी उठला नसता.
पण असे असले तरी तो अत्यंत दिलदार होता. दिलेला शब्द पाळण्यासाठी तो काहीही करायला तयार असे. अगदी काहीही. शिवाय त्याच्या कट्टर शत्रूंनाही तो चटकन मित्र बनवत असे. माणसे आपलीशी करण्याची त्याची हातोटी विलक्षण होती. अगदी गोवा-बेळगाव-तळकोकणापासून ते नाशिक-नगर भागापर्यंत त्याची मित्रमंडळी पसरलेली होती. त्यामुळे या गावांतले लोक आमच्या गावी त्याचे नाव घेऊन येत आणि त्यांची कामे होत; तर आमच्या गावातले लोक तिथे जाऊन याचे नाव सांगून आपले काम करून घेत.
त्याची एक नाजूक बाब म्हणजे, तोही कधीमधी चित्र काढत असे, कविता करत असे, नाटक लिहीत असे. त्याच्या एका मिथ्यक एकांकिकेचे कथानक तर अत्यंत हृदयस्पर्शी होते. तो नाटकात कामही करत असे. पण त्याचे एकंदर रूप पाहून त्याला कोणी कलाकार मानत नसत, याची त्याला खंत होती. (आणि कित्येक वर्षांनी परवाच त्याने फोनवर मला एका समांतर चित्रपटाची त्याला सुचलेली कथा ऐकवून “विश्या, कमला हासनचा फोन नंबर काढ रे, भेटू या त्याला.” असे म्हटले, तेव्हा तो कमला हासनला भेटणारच याची खात्री वाटली.)
असेच एक दिवस राजाला मी म्हणालो, "राजा, कंटाळा आला. मस्त नाटक बसवावे म्हणतो!" त्यावर तो म्हणाला, "अरे विश्या, बसवू या की रे!" मग बघता बघता त्याने गावातल्या सगळ्या नाटकहौशी मंडळींना गोळा केले. तालमींसाठी फुकट हॉल मिळवून दिला आणि प्रयोगाची तिकिटेपण खपवली. नाटकाच्या दिवशी नाट्यगृहाच्या बाहेर उभे राहून पाहुण्यांचे स्वागत करण्याऐवजी स्टेजवर प्रॉपर्टी नीट लागते की नाही, काम करणाऱ्या प्रत्येकाला जे पाहिजे ते मिळते की नाही, ते पाहिले. मग विंगेत उभे राहून नाटक पाहिले आणि पडदा पडल्याबरोबर गायब झाला. असा हा राजा.
तर सांगण्याचा मुद्दा असा की, मला नोकरी नसण्याच्या काळात (त्या काळाला बेकारी म्हणणे जिवावर येते, कारण मला नोकरी नसली तरी मी 'बेकार' नव्हतो...) मी त्याच्या गॅरेजवर जाऊन चकाट्या पिटत असे किंवा आपल्याला आता 'वेळ मारण्यासाठी' काय करता येईल याचा आराखडा तयार करत बसे. असाच विचार करता करता मला एक विलक्षण कल्पना सुचली. तसा मी पूर्वीपासूनच अत्यंत विलक्षण विचारशक्तीचा माणूस आहे!! राजाच्या गॅरेजात एका मोटोक्रॉस रेसचा फोटो होता. फोटो कसला?- कॅस्ट्रॉल ऑइल कंपनीचं कॅलेंडर होतं ते. ते बघता बघता मी त्याला म्हणालो, "राजा, आपण एक मोटोक्रॉस रेस ठेवली तर?"
नेहमीप्रमाणेच राजा म्हणाला,"अरे विश्या, ठिवू या की रे!"
राजाचं "...की रे!" म्हणजे जे ठरवले आहे ते होणारच याची खात्री! आणि मोटोक्रॉस म्हणजे तर राजाचा आवडता विषय! दुचाकी वाहनांमधला मोठा मुरलेला माणूस तो. त्याच्या वयाच्या विशीत त्याने अनेक गाव/तालुका/ जिल्हापातळीवरच्या रोड रेस स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. रोड रेस कसल्या? रोड रेज (Road Rage) स्पर्धाच असायच्या त्या! दोन-तीन मोपेड रेसेस मध्ये त्याने नंबरही मारला होता. त्या दिवसात मोपेड हे वाहन फार वापरात होते. सामान्य माणसाला परवडणारी स्वयंचलित दुचाकी. हीरो-मॅजेस्टिक, कायनेटिक लुना, टीव्हीएस ५० इतकेच काय, पण समस्त गवळी समाजाची आवडती; कोल्हापूरच्या घाटगे पाटलांची लक्ष्मी, या साऱ्या गाड्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी 'मॉडिफाय' करून देण्याची राजाची खासियत होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या दुचाकी वाहन स्पर्धेबद्दल त्याला प्रचंड आत्मीयता असणे स्वाभाविक होते.
त्याने मोटोक्रॉसचे मनावर घेतले आणि बघता बघता ती बातमी गावभर पसरली. हौशी मंडळी गॅरेजवर चकरा मारू लागली. स्पर्धा कधी घ्यायची, कुठे घ्यायची, कशी घ्यायची याची खलबते होऊ लागली. यामध्ये राजाचे समव्यावसायिक (म्हणजे मिस्त्रीगण), त्याचे इतर अनेक प्रकारचे मित्र, माझ्या नाटकमंडळातील या यंत्रक्षेत्राशी दूरदूरचा संबंध नसलेली कलाकार मंडळी आणि नेहमीप्रमाणेच विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते अशी मांदियाळी होती. ही सारी मंडळी गॅरेजवर जमू लागली, राजा "बारक्या, चार च्या सांग रे" असे वारंवार म्हणू लागला आणि दिवसाकाठी सहा-सात ब्रिस्टॉलची पाकिटे फस्त होऊ लागली.
निव्या, विष्णू, बालमुकुंद, देवू, ही गॅरेजवाली मंडळी; श्रीनिवास पाडळे, उत्तम पाटील, विकास पाटील, सुदर्शन माळी हे राजाच्या खास 'बैठकी'तले; तर निशिकांत मुक्कणावर, किरण परचुरे, हेमंत सावंत, अजय जोशी, संजय कणकवलीकर असे माझे नाटकमंडळातले दोस्त या बैठकांना नियमित हजेरी लावू लागले. ही बैठक प्रत्येक दिवशी सकाळी दहा ते रात्री एक-दोन वाजेपर्यंत फक्त जेवणाच्या अपरिहार्य सुट्ट्या घेऊन सुरू असे. म्हणजे नेहमीच्या भाषेत आम्ही सर्व मंडळी राजाच्या गॅरेजवर पडीक राहू लागलो.